Being Woman

‘टोमॅटोची शेती’

डाग अच्छे नही लगते . कपड्यावरचे ठीक आहेत पण हातावरचे डाग कसे चांगले वाटतील ? आमच्या शेतात टोमॅटो केलेत. ते सगळं शिरबातात्या आणि त्यांची मिसेस इंदू बघतात. आम्ही गेल्यावर जमेल तशी मदत करतो. म्हणजे आवडते शेतीमातित काम करणे. तर ते दोघेच टोमॅटो तोडत होते . शिरबातात्या क्रेट उचलून आणत होते. मीही तोडू लागले. वाकून तोडणे कंबर दुखून येत होती. बाई सांगितली पण आलीच नाही. मजुरांची ही मोठी समस्या. टोमॅटो तोडणे लांबवता येत नाही. आम्ही गेल्यामुळे त्यांना तेवढाच हातभार लागला. ते सकाळी सहा वाजता आलेले. आम्ही अकरा वाजता गेलो. दोन वाजले. नंतर ते निवडून क्रेट भरले. २८ क्रेट भरले. वीस किलोचे क्रेट शिरबातात्या उचलून चिखलाच्या सरीतून आणत होते. साठी ओलांडली तरी हे लोक किती कष्टाचे काम करत असतात!!!
टोमॅटो लागवडीचे काम करताना बायका तरुण आणि काटकच लागतात. भांगलण ऐंशी पंच्याऐंशी वयाची म्हातारी करू शकते. पण बांधणी तोडणी तरुण बाईच करू जाणे. एकदीड फूट झाले की पहिली बांधणी. पाच फुटावर दोन काठ्या त्रिकोणी रोवायच्या. अशा ओळीने रोवलेल्या काठ्यांना तारा बांधायच्या. मग अलगद सुतळीने ते झाड तारेला बांधायचे. जशी वाढ होईल तसं बांधत जायचे. आतापर्यंत तीन वेळा बांधणी झाली. खाली वाकून करावी लागते. वयस्कर बाईला जमत नाही. दहा बारा किलो सुतळीच लागली. पंधरा हजाराच्या काठ्या लागल्या. सतत औषध फवारणी , खते वगैरे. टोमॅटो यायला लागले की कुत्र्यांचा सुळसुळाट. किती हाकलले तरी सरीतून इकडून तिकडे घुसतात. टोमॅटो तोडताना तारा , काठ्या सगळेच खाली येण्याची शक्यता. छोटी पिल्ली लांब सोडून आले. पण मोट्या कुत्र्यांना सतत हाकलावे लागते. असं सतत काहीना काही चालू राहते. टोमॅटो नासके तिथेच टाकतात मजूर बायका. ते उचलून टाकायला त्यांना घाण वाटते. मग शिरबातात्या आणि इंदू ते गोळा करून लांब नेऊन टाकतात नाहीतर चिलटांचा त्रास. चिलटं टोमॅटोवर बसून नासणार. टोमॅटो तोडताना झाडाची कुस चिक लागून हात काळे करपल्या सारखे होतात. साबणाने निघतच नाहीत . दगडाने तरी किती घासायचे. आग होते. पुढच्या आठवड्यात नांदेडला जायचेय. मातोश्री केवलबाई वीरभद्र पुरस्कार घ्यायला. आता हे हात आणि बोटे , नखे कशी साफ करायची याची काळजी लागलीय मला. कपड्यावरचे डाग ठीकेच कपडे बदलता येतात. पण हात कसे बदलायचे ?
शेती करायची आवड आहेच. रक्तातच आहे ते. लेखनही करायचे. चांगले ही दिसायचे. या सगळ्याचा मेळ कसा घालायचा?
०००

सावित्री जगदाळे
१८ / ११ / २३

Share :