Being Woman

गृहिणींचा आत्मविश्वास, आरोग्य आणि आनंद’

‘गृहिणींचा आत्मविश्वास, आरोग्य आणि आनंद’

आत्मविश्वास, आरोग्य आणि आनंद हे एकमेकावर अवलंबून असणार त्रिसूत्र आहे . आनंदी स्त्री ला आत्मविश्वास असतो आणि ती निरोगी असते. आत्मविश्वासू स्त्री ला आरोग्य आणि आनंदाचे वरदान मिळालेले असते (किंवा थोड्या प्रयत्ना नी मिळते.) निरोगी स्त्री आनंदी असते आणि आत्मविश्वास तिच्या पासून दूर राहू शकत नाही. गृहिणी या शब्दाची व्याख्या बघायला गेलो तर अशी आहे की विवाहित स्त्री जी घरात राहून संपूर्ण घराची आणि कुटुंबाची काळजी घेते, घरात हवे नको बघते आणि घरातले सर्व काम करते. या व्याख्येमुळे च लोकाना असे वाटत असते की गृहिणी म्हणजे दिवसभर जिला वेळच वेळ आहे, जी दिवसभर सोफ्यावर बसून टीव्ही, सिनेमा पाहू शकते, हवा तेव्हा चहा, कॉफी घेवून नवीन काही करमणूक करत बसत असते. जिला टारगेट्स नसतात, सकाळी सकाळी ट्रॅफिक ला तोंड द्यावे लागत नाही. काहीही हवे असेल तर फक्त नवऱ्याला सांगायचे.

खूप लोकांचा हा गृहिणी बद्दल चा सर्रास (गैर)समज असतो, शिवाय आपल्याकडे पैशानी घराला हातभार जो लावतो त्याचे कळत नकळत महत्व जास्त असते आणि हा समज दृढ होत गेल्यामुळे गृहिणी नि स्वतःच स्वतःच्या कामाला नकळत कमी महत्व दिले आणि त्यामुळे तिचा आत्मविश्वास आपसुकच नाही च्या घरात असतो. आपण या जगात याच्या शिवाय येतो, कुणाकडेही हा प्रत्येक वेळी असतोच असे नाही, याच्या बद्दल फक्त बोलून तो आपल्याला मिळेल असे नाही किंवा डॉक्टर कडे जाऊन एखादी गोळी घेऊन हा आत्मसात होईल असे नाही.. मी आत्मविश्वासाबद्दल बोलते आहे. मुख्यत्वे आपण स्त्रियांना आत्मविश्वासाची कमतरता जरा जास्त जाणवते कारण आपल्याला लहानपणा पासून शिकवले गेले आहे की शक्यतो आपण स्वतः अगोदर दुसऱ्याची काळजी घ्यायची असते म्हणून स्वतःची प्रगती करण्यासाठी कधीच आपल्याला वेळ मिळत नाही .

  • स्वतःची जबाबदारी स्वतः घेणे : ही आत्मविश्वासा कडे जाण्याची ही सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी आहे. तुम्ही आणि फक्त तुम्हीच स्वतःच्या आयुष्यात बदल करू शकता, नवीन गोष्टी आणू शकता. तुम्ही जर अनपेक्षित पणे तुमच्या आयुष्यात बदल होऊन तुम्हाला भरपुर आत्मविश्वास मिळावा अशी वाट पाहत असाल तर तुम्हाला फक्त वाटच पहावी लागेल. आपण हे लक्षात ठेवणे जरूरी आहे की आत्मविश्वासाकडे जाणारा मार्ग तुम्ही पार करायचं असतो. तुमच्या साठी हे काम दुसरे कोणीही करू शकत नाही. म्हणून स्वतःला आत्मविश्वास मिळवून देण्याची जबाबदारी स्वतः घ्यायची.
  • आयुष्यात नवीन प्रयोग करा : नवीन काही करून बघा, पूर्वी पासून असलेली एखादी इच्छा पूर्ण करा. मैत्रिणीबरोबर ट्रीप असेल किंवा, कधीतर एकटे सिनेमा ला जाणे असेल.. करून बघा. एखाद्या वेगळ्या विषयाची माहिती घ्या, शिका. गायन, वाद्य शिका, पेंटिंग शिका, किचन गार्डन, टेरेस गार्डनिंग, ऑनलाइन पेमेंट करायला शिका. स्वतःच्या क्षमता ना वेळोवेळी कार्यरत ठेवल्याने आपल्या आत्मविश्वासात भर पडायला मदत होते. आपण स्वतः वर अवलंबून राहू शकतो याची सुखद जाणीव होते.
  • व्यक्तिगत प्रगती साठी योजना करा आणि त्याची अंमलबजावणी करा : एक एरिया निवडा ज्या मध्ये तुम्हाला काही प्रगती करायची आहे उदा. वजन कमी करणे, इंग्रजी बोलायला शिकणे, गिटार वाजवायला शिकणे. तुम्हाला कितपत प्रगती किती दिवसात करायची आहे याचा एक चार्ट बनवा आणि त्यासाठी कोणत्या स्टेप्स घेणे महत्वाचे आहे ते ही लिहा आणि प्रत्येक स्टेप ची अंमलबजावणी प्लॅन प्रमाणे करा – न चुकता. तुम्ही प्रत्येक स्टेप जेव्हा यशस्वी रित्या पूर्ण करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास फार मोठी मदत होते.
  • हे करत असताना सातत्य खूप महत्वाचे असते. आत्मविश्वास तुम्ही किती नवीन गोष्टी करता या मुळे येत नाही तर तुम्ही किती सातत्याने ती एक गोष्ट करता यावर अवलंबून असतो.
  • गुरु मैत्रीण शोधा : वरील सर्व टिप्स तुम्ही करून पहिल्या पण म्हणावं तसा तुम्हाला फरक वाटत नाहीय पण तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला थोडी मदत हवीय. अशी गुरु मैत्रीण शोधा जी या मार्गावर आत्मविश्वासाने पुढे जातेय . तिच्याशी बोला , तिचा अक्शन प्लॅन बघा, त्यातून शोधा की तुमच्या प्लॅन मध्ये तुम्हाला कुठे बदल करायचे आहेत. जे लोक आत्मविश्वासू असतात ते मदतीला नेहमी तयार असतात.

आत्मविश्वासाला सबळ हातभार अजून एक गोष्ट लावते ते म्हणजे चांगले आरोग्य!निरोगी स्त्री ही नेहमी आनंदी आणि आत्मविश्वासू असते.जी गृहिणी पूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेते ती स्वतःच्या आरोग्या बद्दल खूप शिथिल असते. जर आपला कप रिकामा असेल तर आपण त्यातून कुणाला ही काही ही देवू शकत नाही तसेच जर आपण निरोगी नसू तर कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे हे चॅलेंज होऊ शकते.आठवड्यात कमीत कमी ४ वेळा व्यायाम करा.चालणे, जिम, झुमबा, योगा, डांस .. तुम्हाला आवडेल तो कोणताही प्रकार निवडून तुम्ही हा व्यायाम करू शकता.आनंदी राहण्याचा हा एक अतिशय शास्त्रोक्त उपाय आहे. व्यायाम केल्याने झोप व्यवस्थित लागते आणि त्यामुळे आरोग्य उत्तम राहते.व्यायामा बरोबरच तुम्ही काय आणि किती खाता हे पाहणे जरूरी असते. अति तिखट, अति खारट आणि अति गोड हे अपायकारक असते. तसेच खूप तेलकट आणि मसालेदार पदार्थ ही फार खाऊ नयेत.जेवणामध्ये फायबर्स चा भरपूर समावेश असावा.या मध्ये कडधान्ये, ड्राय फ्रुट्स, साली न काढलेली फळे, खूप पॉलिश न केलेले तांदूळ आणि गहू ई . येतात . हे झाले शरीराचे आरोग्य पण मनाचे आरोग्य ही तेवढेच महत्वाचे असते आणि आनंदी राहणे हे मन निरोगी असले की सहज शक्य होते.

दिवसातून एखादा तास फक्त स्वतःसाठी काढा. तो वेळ फक्त ‘माझा वेळ ‘ म्हणून ठेवा. स्वतःला आवडेल असे काही करा. गाणी म्हणणे, गाणी ऐकणे, पुस्तक वाचणे असे छंद जोपासू शकता. आवडत्या मैत्रिणी ना घरी बोलावून छान गप्पा मारू शकता, नियम असा ठेवायचा की दुसऱ्या व्यक्ति बद्दल चर्चा तेव्हाच करायची जेव्हा आपण त्यांचं कौतुक करू किंवा चांगले बोलू. नवीन विषयावर गप्पा मारा, ज्ञान वाढवा. फक्त लक्षात घ्या या ‘माझ्या वेळा’ मुळे तुमच्या मनाला उभारी आली पाहिजे. शास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या प्रयोगातून हे सिद्ध झाले आहे की आनंदी राहणे हा एक फार मोठा फायदा आहे. शरीरा साठी, मनासाठी, चांगले आयुष्य जगण्यासाठी, नाती जपण्यासाठी ही . आनंद तणाव दूर करतो, हृदया चे रक्षण करतो आणि वेदना कमी करतो. तुम्हाला हे माहितीच असेल की आपल्याला स्मित हास्य करण्यासाठी लागणारे चेहऱ्या वरचे स्नायू हे आठ्या घालण्या साठी लागणाऱ्या स्नायू पेक्षा निमपटीने कमी असतात. म्हणून निरोगी राहण्यासाठी शरीरातले स्नायू जास्त आणि चेहऱ्यावरचे स्नायू कमी वापरूया.. स्माइल करूया !!

प्रयोगातून असे ही सिद्ध झाले आहे की तुम्ही वेदना होत असताना हसण्याचा प्रयत्न केला तर वेदना ही कमी होतात. आपल्या मेंदू ला आपण फसवू शकतो, आपण खोटे ही स्माइल केले तर मेंदू ला वाटते की आपण आनंदी आहोत आणि मग काही ‘हॅपीनेस होर्मोन्स’ निर्माण होतात. ज्यामुळे आपल्याला त्या क्षणाला आनंदी राहण्याचा फायदा मिळू शकतो, वेदना दूर व्हायला मदत होते. मैत्रिणीनो, आनंदाचा शोध घेत फिरू नका, रोजच्या जगण्यातच आनंद असतो.. मैत्रिणीं बरोबर वेळ घालवणे, मुलांबरोबर संवाद साधणे, संगीत, बाग, निसर्ग या छोट्या छोट्या गोष्टी मध्ये अतोनात आनंद असतो.या क्षणात जगा, आनंद पुढे ढकलू नका.( मुलाच लग्न झाल्यावर, मुलीचं शिक्षण झाल्यावर, घर झाल्यावर, मिस्टर रिटायर झाल्यावर )माझ्यासाठी फार चांगला उपयोग झालेली एक ट्रिक म्हणजे कृतज्ञता बोलून दाखवणे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जीवना बद्दल कृतज्ञता व्यक्त करा ( उदा.मी माझ्या कुटुंबासाठी, घरासाठी,माझ्या गाडीसाठी, माझ्या आरोग्या साठी, माझ्या जीवनासाठी खूप कृतज्ञ आहे )आनंदाचा अजून एक ‘शुअर शॉट’ उपाय म्हणजे ‘दान’ करणे. आपण समाजाला खूप काही देणे लागतो, देण्या मध्ये खूप आनंद आहे. आपल्या ऐपती प्रमाणे दान करावे, आनंद मिळवण्याचा हा ही एक निखळ मार्ग आहे. अगदी रोज एक पोळी, भाजी असो किंवा रोज पाच रुपये असोत. कोणतेही ‘दान’ अमोल असते आणि त्याचा आनंद घेणाऱ्या पेक्षा देणाऱ्याला भरपूर मिळतो.आपल्याला लक्षात येत असते की आपण कोणा बरोबर आनंदी असतो, कोणाबरोबर जेवढ्याच तेवढे बोलतो आणि कोणाला टाळतो . ज्यांच्या बरोबर राहून आनंद मिळतो अशाच मैत्रिणी ठेवा आणि त्यांच्या बरोबर च वेळ घालवा, सकारात्मक लोक शोधा जे तुम्हाला आनंदी ठेवतील आणि सकारात्मक बना आणि आपल्या मैत्रिणींची प्रेरणा बना. भरपूर हसा , जोरात हसा, डोळ्यात पाणी येई पर्यन्त हसा .

चला तर मैत्रिणीनो, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ !!

पौर्णिमा पाटील

Share :