Being Woman

गझल

‘गझल’

गझल हा तंत्रशुद्ध काव्य प्रकार असून  गझल नेहमी वृत्तातच लिहिली जाते. कोणती ही रचना एक तर गझल असते किंवा गझल नसते.

गझलची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.  तिचे नियम असतात. एकाच वृत्तातील एकच काफिया म्हणजेच यमक आणि रदीफ म्हणजेच अन्त्य यमक असलेल्या दोन दोन ओळींच्या रचना (ज्याला शेर असे म्हणतात)! किमान पाच, सात,  नऊ किंवा जास्ती शेरांची मालिका/रचना म्हणजेच गझल होय.

शेर हे गझलेचे एक एकक असतं ज्यामध्ये दोन ओळी असतात. शेरातील पहिल्या ओळीला उर्दूमध्ये उला मिसरा तर दुसऱ्या ओळीला सानी मिसरा म्हणतात. पहिल्या ओळी मध्ये एखाद्या मनोवस्थेची, घटनेची प्रस्तावना मांडली जाते आणि दुसर्‍या ओळीत तिला कलाटणी देणारा समारोप केलेला असतो. या कलाटणीमुळेच श्रोत्यांच्या काळजाला हात घातला जातो कारण शेरांमधून जो खयाल मांडलेला असतो तो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेला , सार्वत्रिक असतो आणि त्याचा समारोप मनाला चटका लावणारा असतो.

प्रत्येक शेर म्हणजे दोन ओळींची एक परिपूर्ण कविताच असते. कवितेत जसे तीन-चार कडव्यांमधून एक कल्पना उलगडत नेतात तसे गझलचे नसते. गझल मधील प्रत्येक शेर अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतो त्यामुळे एकाच गझलेतील शेरात अनेक विषय हाताळता येतात.

गझलला त्यातील खयालांच्या मांडणीमुळे उत्स्फूर्त दाद  मिळते. त्यामुळे गझलहा काव्य प्रकार फार लोकप्रिय होत गेला. अमीर खुसरोने गझलचा, “चलता फिरता जादू जो लोगों के सरपर चढकर बोलता है” असा सन्मान केला आहे.

डॉ. कैलास गायकवाड म्हणतात,

जी विजेचा लोळ नाही

ती गझलची ओळ नाही

आकाशातली वीज ज्या प्रमाणे कडकडाट करत सगळा आसमंत उजळून टाकते त्या प्रमाणे गजलेची ओळ म्हणजेच शेर देखील आपले मनाकाश उजळून टाकते. त्याच गझलेचा हा पुढचा शेर पहा.

लागली शाळेस सुट्टी

अन्मला आजोळ नाही

वर म्हटल्याप्रमाणे लागली शाळेस सुट्टी ही ओळ वाचल्यानंतर श्रोत्यांच्या/वाचकांच्या मनामध्ये शाळकरी वयातले बालपणीचे सुट्टीतले मजेत घालवलेले दिवस आठवतात ज्यात आपण आजोळी मामाच्या गावाला गेलेलो असतो. आजीच्या लाडाकोडात मायेच्या कोशात प्रेमाने माखलेले ते दिवस हा प्रत्येकाचा हळवा कोपरा असतो. पण पुढच्या ओळीत अन्मला आजोळ नाही हे वास्तव असं सांगितल्या वर मनाला चटका बसतो. श्रोत्यांच्या काळजाला हात घालण्याची ताकद या शेरात असते म्हणूनच गझलेस उत्स्फूर्तपणे दाद मिळते.

असा कलाटणी देणारा शेवट हेच शेराचे वैशिष्ट्य असते.

गझलही कवितेपेक्षा वेगळी ठरते. संवादीपणा(बोलकेपणा), आर्तता, उत्कटता, कथनात्मकता असे शेराचे घटक आपणास दिसतात. गझलची मूळ प्रवृत्ती हळूवारपणा,  दिलदारवृत्ती, संपूर्ण समर्पणहीच असल्याचे अभ्यासा अंतीदिसते.

गझल ही मुळातच परकीय भाषेतून आलेली असल्यामुळे तिची एक स्वतंत्र परिभाषा आहे.

ही परिभाषा आपण पुढच्या भागात सोप्या शब्दात समजून घेऊया.

स्वाती यादव.
10-12-2020.
9673998600

Share :