Being Woman

blog img

‘कॅलिडिओस्कोप’

*स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घे रे पाखरा…*

22 जून 2016 रोजी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला भारताचा पहिला” पिको” सॅटलाईट “स्वयम्” आकाशात झेपावला या प्रकल्पाच्या प्रमुख होत्या  केमिस्ट्री” विषयाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर मनीषा खळदकर !!!!” 

2008 सालीं “स्वयम् “या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली प्रकल्प प्रमुख पदावर मनीषा खळदकर यांनी  सतत आठ वर्ष एक हाती काम पाहिले. वजनाच्या वर्गवारीनुसार स्वयम् हा “पिको सॅटलाईट “होता याचे वजन ९९०ग्रॅम होते. स्टॅबिलायजेशन विदाऊट युजिंग  एक्स्टर्नल पॉवर म्हणजेच स्वयम्…  दुर्गम पर्वत,  समुद्र किंवा जंगलात भरकटलेल्या मानवाला किंवा बोटींना या सॅटेलाईट द्वारे सिग्नल देता येऊ शकतो आणि त्यांची त्या ठिकाणाहून यशस्वीपणे सुटका होऊ शकते. बनवण्याकरता सुमारे 35 ते 40 लाख रुपये खर्च येणार होता. या प्रकल्पासाठी कोणतीही ग्रांट  / निधी उपलब्ध झालेला  नव्हता  परंतु अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांनी स्वतःच्या विद्यार्थ्यांवर तसेच  प्रकल्प मार्गदर्शिका यांच्यावर विश्वास ठेवून हा संपूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शवली ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.  

इस्रोने भारतीय विद्यार्थ्यांनी  बनवलेल्या “स्वयम् सॅटॅलाइट ” च्या उड्डाणासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही शिवाय काही  महत्त्वाचे कंपोनेंट्स हि देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले !!!  विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांनी यश खेचून आणले. खरंच नथिंग सक्सीडस लाईक सक्सेस…!!!

या प्रकल्पात विद्यार्थ्यांच्या निवडीपासून ते प्रत्यक्ष सॅटलाईट लॉन्च होईपर्यंतचा प्रवास हा अतिशय रोमांचकारी होता असं डॉक्टर खळदकर यांनी सांगितलं. तांत्रिक बाबींची पूर्तता करून 22 जून 2016 ला सॅटॅलाइट लॉन्चिंग स्टेशन “श्रीहरीकोटा”  येथून स्वयम् चे यशस्वी उड्डाण झाले तेव्हा”आनंद गगनात न मावणे “या वाक्प्रचाराचा खरा अर्थ आपल्याला  उमजला असं डॉक्टर खळदकर यांनी सांगितलं.

डॉक्टर मनीषा खळदकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित  करण्यात आले. मार्च 2017 मध्ये गांधी यंग टेक्नॉलॉजी इनोव्हेशन अवॉर्ड  ( GYATI)  राष्ट्रपती भवनामध्ये सन्मानपूर्वक देण्यात आलं.पुणे येथे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आलं.नोव्हेंबर 2019 मध्ये संत ईश्वर सेवा सन्मानाच्या ही त्या मानकरी ठरल्या. डीआरडीओ तर्फे आय डब्ल्यू डी स्माईल अवॉर्डनेही त्यांना गौरववण्यात आलं. राज्यपालांच्या हस्ते इनोव्हेटिव्ह टीचरअवॉर्ड पुरस्कार प्राप्त डॉक्टर मनीषा खळदकर म्हणाल्या,”स्वयम् ” च  यशस्वीपणे अवकाशामध्ये उड्डाण  झालं… तो क्षण  माझ्यासाठी सर्व पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ होता.

“अवकाश विज्ञान “शाखेमध्ये आजही स्त्री शास्त्रज्ञांचे प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत खूप कमी आहे  या विज्ञान शाखेचा महिलांनी करिअर साठी जरूर विचार करावा असं डॉक्टर खळदकर यांनी नमूद केलं. कॉलेज मधलं अध्यापनाचं काम,  स्वयं  प्रकल्पाचं कामआणि स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी यांचा मेळ आपण कसा घातला हे सांगताना डॉक्टर मनीषा खळदकर म्हणाल्या स्त्रियांमध्ये जात्याच मल्टिटास्किंग करण्याची क्षमता असते.स्त्रियांनी  तीओळखली पाहिजे . आपल्या आवडीची  अनेक कामे  आणि आपल्या मुलांचं पालकत्व ही कामे स्त्रिया एकाच वेळी लीलया करू शकतात. 

मला माझ्या कामांमध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांची कुटुंबीयांची, नातेवाईकांची आणि घरामध्ये काम करणाऱ्या मावशींची तसंच माझ्या ड्रायव्हरची ही मदत झाली”.. हे त्या मोठ्या अभिमानाने सांगतात. मुलांच्या निकोप वाढीसाठी “सुजाण पालकत्वाचे “महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितलं लहानपणापासूनच मला आकाश निरीक्षणाचा छंद होता माझे हे कुतूहल च स्वयम् च्या निर्मितीसाठी प्रेरणा ठरले. माझे बालपण अतिशय सुसंस्कृत,  सुविद्य, मुलगा – मुलगी असा कोणताही भेदभाव न मानणाऱ्या कुटुंबामध्ये गेले.

आपल्या पाल्याचा कल ओळखून पालकांनी मुलांना शिक्षणाची योग्य दिशा दाखवावी  म्हणजे पुढील पिढी खऱ्या अर्थाने “सु – शिक्षित”  होईल. मुलांच्या जडणघडणीमध्ये स्त्रियांचा म्हणजेच “आईचा “सहभाग हा अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा आहे असं “बि इं ग  वूमन”  च्या सर्व वाचक भगिनींना त्यांनी सांगितलं.डॉक्टर मनीषा खळदकर यांना  वाचनाची, प्रवासाची ,बागकामाची, संगीताची आणि स्वयंपाक करण्याची आवड आहे !!!!म्हणजेच स्वयंपाक घरापासून ते अवकाशापर्यंत सर्वसंचारी असणाऱ्या

डॉ. मनीषा योगेश खळदकर यांच्यासाठी ” स्काय इज नॉट द लिमिट”असेच म्हणावेसे वाटते.डॉ.  मनीषा खळदकर यांच्या  पुढच्या गगनभरारीला  बीइंग वुमन  तर्फे अनेक शुभेच्छा..

Share :