Being Woman

आकाशदर्शन

‘आकाशदर्शन ‘

अंबरिष

       सप्तर्षींच्या चौकोनाच्या वर एक तारकासमूह आहे त्याचे नाव अंबरिष.  पाश्चात्त्यांमध्ये या तारकासमूहाला वेगळे नाव किंवा वेगळे अस्तित्वच नाही.  त्यांच्याकडे तो सप्तर्षींचाच भाग समजतात.  सप्तर्षींच्या चौकोनातल्या वरच्या दोन ताऱ्यांनी म्हणजे पॉईंटर ताऱ्यांनी डोक्यावर एक भांडे घेतले आहे अशी कल्पना केली की अंबरिष दिसेल. या भांड्याला एक दांडापण आहे कपाच्या कानासारखा, गोलाकार नाही उभा. असा हा अंबरिष तारकासमूह दिसतो. त्याची आपल्या पुराणातली  एक मनोरंजक गोष्ट :

        अंबरिष हा अयोध्येच्या सूर्यवंशी राजांपैकी एक राजा होता.  तो भगवान विष्णूंचा परमभक्त होता. एकदा अंबरिषाकडे दुर्वास ऋषी अतिथी म्हणून आले होते. त्या दिवशी राजाकडे द्वादशी व्रताचे पारणे होते. राजाने दुर्वास ऋषींना आदराने जेवायला बसवले पण दुर्दैवाने दुर्वासांना वाढलेल्या खिरीत त्यांना एक केस दिसला. झाले त्यांना संतापायला कारणच मिळाले. ते राजावरच चिडले आणि त्याला शाप  द्यायला निघाले. राजाला मारण्यासाठी त्यांनी एक कृत्या निर्माण केली आणि ती राजाच्या मागे सोडली पण भक्तांच्या मदतीला नेहेमीप्रमाणे भगवान विष्णू धावून गेले. त्यांनी आपले सुदर्शनचक्र त्या कृत्येवर सोडले. त्या चक्राने त्या कृत्येला ठार मारले आणि नंतर ते दुर्वासांच्या मागे लागले, त्यांना पळता भुई थोडी झाली. शेवटी अतिशय भयभीत होऊन ते राजा अंबरिषाकडे आले आणि त्यांची क्षमा मागू लागले, तेव्हा कोठे ते चक्र शांत झाले. अशी ही अंबरिषाची गोष्ट.

लीना दामले.                                     

Share :