Being Woman

‘अपर्णा गुळवणी ‘

‘अपर्णा गुळवणी ‘

आपले सोशल मीडिया ज्यावर आपण तासन्तास घालवत असतो, त्या सोशल मीडियामध्ये आज आपण जरा डोकावून पाहूया. सोशल मीडिया म्हणजे असे माध्यम ज्यामध्ये आपण आपले विचार सार्वजनिकरित्या मांडू शकतो आणि समाजाशी कनेक्ट करू शकतो. ही झाली सोशल मीडिया ची व्याख्या. आता यामधला सार्वजनिक शब्द फार महत्त्वाचा आहे. आपले विचार जगातील सर्व लोक वाचू शकतात, आपल्या प्रतिक्रिया आपण सर्वांसमोर मांडू शकतो ही कल्पना जेवढी रोमांचित करणारी आहे ,तेवढीच अचंबित करणारी आहे आणि तेवढीच विचार करायला लावणारी आहे. रोमांचित यासाठी की आपले विचार सर्व जगापर्यंत पोहोचू शकतो हे काही वर्षांपूर्वी कल्पने पलीकडे होते. अचंबित करणारी आहे कारण जर विचार केला की जगातले अब्जावधी लोक आपले विचार सोशल मीडियावर मांडतात तर किती डेटा तयार होत असेल आणि या डेटाचा काय केलं जात असेल आणि हा डाटा मॅनेज कसा करतात? पण जर थोडं खोलात जाऊन विचार केला तर हा प्रश्न पडू शकतो की आपला डेटा अजिबातच खासगी नाही राहणार? मग जर चुकून एखादा फोटो किंवा एखादं वाक्य कोणाला पाठवलं गेलं तर त्याचं काय होईल? सगळ्यांसाठी नसणारा डेटा पण जर सर्वांना पोचला तर? वाचला तर ? पहिला तर? वेलकम टू डेटा प्रायव्हसी!!!!

आपणास आपण आज पाहूया की ही जी डेटा प्रायव्हसी आहे, ती खरोखरच अस्तित्वात आहे का? की ज्याला आपण प्रायव्हेट समजत होतो तो सर्व डेटा सार्वजनिकच आहे!!! फेसबूक, टि्विटर, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम , स्नॅप च्याट, आणि असे अनेक ॲप प्रत्येकाच्या मोबाईलवर इन्स्टॉल केलेले असतात. प्रत्येक भारतीय साधारण चार तास रोजचे या सोशल मीडियावर खर्च करतात. डेटा प्रायव्हसी ही प्रत्येक सोशल मीडिया ॲप कंपनीची जबाबदारी आहे. प्रत्येक सोशल मीडियावर चे वाक्य हे त्या व्यक्तीला अपेक्षित असणाऱ्या व्यक्ती अथवा व्यक्तीं पर्यंतच पोचले पाहिजे. मधूनच या डेटा ला हॅक करता येऊ नये आणि केलं तरी तो डेटा encrypted फॉरमॅटमध्ये असावा त्यामुळे कोणालाही वाचता येणार नाही. प्रत्येक ॲप मध्ये प्रायव्हसी सेटिंग असतात, ज्यायोगे तुम्ही तुम्हाला काही गोष्टी खाजगी ठेऊ शकता.
व्हॉट्सऍप मध्ये प्रायव्हसी सेटिंग नावाचा ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा प्रोफाइल फोटो सर्वांना दिसेल की नाही हे ठरवू शकता.

त्याचबरोबर नको असलेल्या व्यक्तींना आपण ब्लॉक करू शकतो ज्यामुळे त्यांचे मेसेजेस आपल्यापर्यंत येणार नाहीत. रोज आपण व्हाट्सअप वर एवढे चाट करतो तर मग तो डेटा कुठे स्टोअर होतो? यामध्ये हे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लोकल बॅकअप आणि दुसरे म्हणजे गुगल ड्राईव्ह. लोकल बॅकअप मध्ये आपण केलेले सर्व चॅट आपल्याच मोबाईल मध्ये स्टोअर होतात. गुगल ड्राईव्ह मध्ये मात्र आपल्या ईमेल आयडी वरून गुगलच्या क्लाऊड वर सर्व डेटा ठेवला जातो. आपला फोन जर कधी फॉरमॅट अथवा नादुरुस्त झाला तर लोकल बॅकअप सर्व नाहीसा होतो पण गूगल ड्राईव्ह वरचा मात्र डेटा आपल्याला परत मोबाईल मध्ये आणि व्हाट्सअप वर घेता येतो. हा सर्व डेटा encrypted फॉरमॅटमध्ये असतो. तो डेटा नुसती आपण फाईल उघडली तरी आपल्याला वाचता येत नाही. आता हा बॅकअप असणे किती फायदेशीर आहे अथवा नाही हे परवाच्या बॉलीवूड प्रकरणावरून सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. ट्विटर मध्ये आपण केलेले सर्व ट्विट सार्वजनिक असतात. पण त्यामध्ये डायरेक्ट मेसेजिंग हा एक पर्याय असतो ज्यायोगे आपण संबंधित व्यक्तीला मेसेज करू शकतो, जो इतर कोणाला वाचता येणार नाही. फेसबुक वरचा प्रोफाइल आपण प्रायव्हेट ठेवू शकतो.

त्याच प्रमाणे फेसबुक वरून लोकेशन सुद्धा आपण प्रायव्हेट ठेवू शकतो.आता हल्ली सर्वजण इंस्टाग्राम वर असतात. फोटो, व्हिडिओ, इंस्टाग्राम स्टोरीज, एक ना अनेक. हे सर्व वापरताना आपण एक लक्षात घेतले पाहिजे की आपण आपल्या व्यक्तिगत डेटा सोशल मीडियावर शेअर करतो याचे परिणाम होऊ शकतात. एखादी पोस्ट आपण जरी डिलीट केली तरी ती कुठे जात नसते. काही काळापुरती ती डिलीटेड पोस्ट ही कंपनीच्या सर्व्हर वर असते. कंपनीला हवी असेल तर कायदेशीर रित्या ती पोस्ट रिकव्हर होऊ शकते आणि ती ते वाचू ही शकतात. यामुळे कोणताही खाजगी डेटा शेअर करताना अथवा पोस्ट करताना आपण काळजी घेतली पाहिजे. थोडक्यात काय एकदा सोशल मीडिया वर काही पोस्ट केलं तरी ते खाजगी राहत नाही ,ते सोशलच होते हे लक्षात घ्यावे.

अपर्णा गुळवणी.
aparna.gulavani@gmail.com

Share :