लेखक: जेम्स हेरिअट
काही दैवी शक्ती प्राप्त झालेली माणसं केवळ आपल्यासारख्या मर्त्य लोकांना आनंद वाटण्यासाठी जन्माला येतात आणि अश्या 3 व्यक्ती ज्या माझ्या डोळ्यासमोर येतात त्या आहेत पु ल देशपान्डे, पि जी वूडहाऊस आणि जेम्स हेरिअट.
एखादा पशुवैद्यक त्याने दूर इंग्लंडमध्ये डेरोबी नावाच्या खेड्यात एखाद्या गाईचं बाळंतपण त्याने कसं केलं याचं वर्णन करेल आणि मी ते खूप हसत वाचेन असं मला कोणी सांगितलं असतं तर माझा विश्वास बसला नसता. पण माझी मोठी बहीण राजश्री हिने या जेम्स हेरिअट नावाच्या व्यक्तीला आमच्या घरात आणलं आणि आनंदाचा ठेवा सापडला. हास्यरस असलेल्या साहित्याला अभिजात साहित्याचा दर्जा मिळत नाही असे म्हणतात पण ते जर खरे असेल तर माझी त्याबद्दल जोरदार तक्रार आहे कारण या 3 लेखकानी जो आनंद मला आणि माझ्या 2 बहिणींना आणि अर्थातच अगणित इतर लोकांना दिला आहे त्याला तुलना नाही. माझ्या धाकट्या बहिणीच्या पुस्तकांच्या कपाटात या तिन्ही लोकांना मानाचे स्थान आहे.
Vet in a Spin या छोट्याशा पुस्तकाद्वारे जेम्स हेरिअट यांचा आमच्या घरात प्रवेश झाला. जेम्स हेरिअट हे जेम्स आल्फ्रेड वाईट (Wight) यांचे पेन नेम. स्कॉटलंडमध्ये लहानाचे मोठे झालेले जेम्स पशुवैद्यक तज्ज्ञ झाल्यानंतर इंग्लंडच्या यॉर्कशायर परगण्यात नोकरीसाठी गेले आणि तिथेच स्थायिक झाले. दुसऱ्या महायुद्धात ते रॉयल एअरफोर्स मध्ये वैमानिकसुद्धा होते आणि या पशुवैद्यकी व्यवसायामधल्या अनुभवांवर आधारित पुस्तके लिहायला त्यांनी त्यांच्या वयाच्या 50 व्या वर्षी सुरुवात केली. या ठिकाणी मी त्यांच्या एका पुस्तकाची निवड केली आहे पण त्यांची सर्वच पुस्तके एकाच श्रेष्ठ दर्जाची आहेत.
All creatures Great and small मध्ये वेगवेगळ्या प्रकरणात जेम्स यॉर्कशायर मध्ये नोकरीसाठी मुलाखतीला आले त्या प्रसंगापासून ते त्यांच्याकडे आलेल्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या केसेस, त्यांच्या क्लीनिकचे वर्णन, त्यांच्या विक्षिप्त पण देखण्या आणि अतिशय हुशार बॉसचे सिगफ्रीडचे वर्णन, सिगफ़्रिडचा खोडकर भाऊ ट्रिस्टनच्या उचापती, यॉर्कशायरच्या निसर्गाचे वर्णन, यॉर्कशायरमधील शेतकऱ्यांची गरिबी, त्यांच्या आजूबाजूचा तसा कठोर निसर्ग, छोट्या प्राण्याचे म्हणजे कुत्री, मांजरे यांचे कधी विक्षिप्त तर कधी अति प्रेमळ मालक, त्यांचे तेथील एका सुंदर मुलीशी प्रियाराधन आणि विवाह त्यांची गोड मुले असा मालमसाला ठासून भरला आहे. जेम्स परदेशी आहेत म्हणून नाही तर सरस्वती त्यांच्या बोटात नाचते आहे असे म्हणले असते इतकी त्यांची इंग्लिश भाषेवर घट्ट पकड आहे. खूपच गोड, सरळ आणि ओघवती भाषा आहे त्यांची. त्याचबरोबर जुन्या काळच्या पशुरोगतज्ज्ञांसमोर काय काय अडचणी होत्या आणि त्या असूनसुद्धा ते प्राण्यांचा इलाज करण्यासाठी कसोशीने कसे प्रयत्न करत याचे रसभरीत वर्णन आहे पुस्तकात. त्याकाळी प्रतिजैविके उपलब्ध नसल्याने इलाज करताना खुप आव्हानं होती आणि इलाजाची उपकरणेसुद्धा प्रगत नव्हती. या आणि जेम्स हेरीअट यांच्या इतर पुस्तकांवर आधारित एक मालिकासुद्धा निघाली आहे. त्यांच्या पूर्वीच्या दवाखान्याच्या ठिकाणी त्यांच्या नावाने म्युझिअम बनवण्यात आले आहे. आजच मागवा त्यांचे एक तरी पुस्तक आणि वाचायला सुरुवात करा. पुन्हा पुन्हा वाचाल आणि माझे आभार मानाल नक्की सुचवल्याबद्दल.
अंजली रत्नपारखी – देशमाने