Being Woman

आकाशदर्शन

‘सप्तर्षी’

      सप्तर्षी हा तारकासमूह बहुतेक सर्वच संस्कृतींमध्ये प्राचिनकाळा पासून प्रसिद्ध आहे.  त्याच्या विशिष्ट आकारामुळे त्याला वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. कोणी त्याला ग्रेट बेअर (Ursa Major) म्हणजे मोठे अस्वल म्हणतात, कोणी हिप्पोपोटामस, कोणी नांगर, दांड्याचे भांडे, चार्ल्सचा गाडा, खाटकाची सुरी अशा असमख्य चित्रविचित्र नावाने ओळखतात.    

       आपल्याकडे भारतात मात्र आपण त्यांना सप्तर्षी म्हणून ओळखतो. चार ताऱ्यांचा एक मोठा चौकोन आणि चौकोनाच्या एका ताऱ्या जवळून खाली वर्तुळाकारात वाढणाऱ्या रेषेवरचे तीन तारे असा सप्तर्षींचा तारकासमूह आहे.  सप्तर्षी मधील सात ऋषींची नावे अशी आहेत.  शेपटीच्या टोकापासून सुरुवात केली तर पहिला तारा मरीची, दुसरा वसिष्ठ आणि वसिष्ठाजवळ असलेला अगदी छोटा तारा म्हणजे वसिष्ठ पत्नी अरुंधती, नंतर अंगिरा, अत्री पुलत्स्य, पुलह आणि क्रतू.  सप्तर्षीमधील योग तारा (अल्फा तारा) म्हणजे सगळ्यात महत्वाचा तारा आहे क्रतू.

सप्तर्षींची गोष्ट 

      प्राचीन काळी एकदा सारस्वत प्रदेशात खूप भीषण दुष्काळ पडला. लागोपाठ 12 वर्षे अवर्षण झाले. सगळीकडे भयंकर हाहाकार माजला होता. सामान्य माणसांचे तसेच पशू पक्ष्यांचे अतिशय हाल होत होते. त्यावेळी माणसे सारस्वत प्रदेश सोडून दशदिशांना जाऊ लागले.  दुष्काळाच्या तडाख्यातून असामान्य विद्वान ऋषी मुनींचीही सुटका नाही झाली. सरते शेवटी तेही सारस्वत प्रदेश सोडून निघाले. त्यांच्या बरोबर तपोनिष्ठ असे सप्तर्षी ही दक्षिण दिशेला जायला निघाले.

       अनेक दिवसांच्या यातनामय प्रवासा नंतर भुकेले, थकले भागलेले असे ते सप्तर्षी मंडळ विदर्भराज वृषादर्भी च्या राज्यात येऊन पोहोचले. तिथे सर्वत्र सुकाळ होता. जेव्हा राजाला कळले की अखंड ज्ञानोपासना करणारे तेजस्वी तपस्वी असे सप्तर्षी आपल्याच राजधानीत येत आहेत तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपल्या सरदारांबरोबर राजा त्यांच्या स्वागताला सामोरा गेला. अत्यादराने राजाने त्यांचे स्वागत केले आणि आमच्या राज्यातच मुक्काम करावा, पाहुणचाराचा स्वीकार करावा अशी नम्र विनंती केली.      

       तहान भुकेने व्याकूळ झालेल्या आणि यातनामय प्रवासाने थकलेल्या सप्तर्षी मंडळाने लगेच उत्तर दिले नाही.  तेव्हा राजा परत आग्रह करून म्हणाला की मुनिवर आपल्या  सारख्यांचे जीवन म्हणजे राष्ट्राची संपत्ती आहे आणि तिचे रक्षण करणे राजा या नात्याने माझे कर्तव्यच आहे. आपली कृश शरीरे बघून मला अत्यन्त क्लेष होत आहेत.  यावर सप्तर्षीं चे प्रवक्ता असलेले अत्री ऋषी म्हणाले ,’ राजा तुझ्या आदरातिथ्याने, सुबुद्धीने आणि राष्ट्रहिताच्या काळजीने आम्ही संतुष्ट झालो आहोत. पण तुझ्या आतिथ्याचा आम्ही स्वीकार करू शकत नाही कारण आमच्यावर असलेल्या नीती बांधनांनी आम्ही बांधले गेलो आहोत.  आम्ही मंत्र द्रष्टे ऋषी आहोत, एवढेच नाही तर सप्तर्षी मंडळाच्या सभासदत्वाचे परमोच्च स्थान आम्ही भूषवितो आहोत. आयुष्यभर केलेल्या मूल्यवान साधनेच्या बदल्यात या सांसारिक क्षुद्र गोष्टी आम्ही स्वीकारू शकत नाही. आमचे शरीर हे देवतांचे निवासस्थान आहे. तेव्हा हे राजा तू रागावू नकोस ,आम्हाला क्षमा कर पण तुझे आदरातिथ्य आम्ही स्वीकारू शकत नाही. ‘ असे बोलून ते तेजस्वी सप्तर्षी मंडळ कष्टाने पावले उचलत अरण्याच्या दिशेने जाऊ लागले.

      इतक्या मर्यादशील पणे राजाचे आतिथ्य त्यांनी नाकारले तरी राजाला खूप राग आला. तो सुडाने पेटला ,त्याला त्यात स्वतःचा घोर अपमान झाल्या सारखे वाटले.   सप्तर्षींना चांगला धडा शिकवायचे त्याने ठरवले.

      आपल्या सल्लागारांच्या सल्ल्याने राजाने एक कारस्थान रचले. सप्तर्षींच्या मार्गा वरच्या सर्व फळ झाडांची फळे आधीच काढून घेतली. आणि एकाच झाडा खाली पडलेल्या पिकलेल्या फळांमध्ये सोने भरून ठेवले.  ते भुकेले ऋषी ही खाली पडलेली फळे बघून नक्की उचलून खातील असे त्याला वाटले.  सप्तर्षी काय करतात  ते बघायला त्यांच्या मागावर राजाने गुप्तचर पाठवले.

       राजाच्या अंदाजाप्रमाणे ती फळे बघून सप्तर्षी मंडळ तिथे थांबले. भुकेने त्यांची अवस्था अतिशयच वाईट झाली होती. एक ऋषी झाडाखाली गेले आणि त्यांनी एक फळ उचलले. अत्री ऋषींना काही शंका आली. त्यांनी ते फळ हातात घेऊन बघितले तर ते वाजवी पेक्षा जड वाटले.  ते वसिष्ठ ऋषींना म्हणाले यात नक्कीच काही तरी जड धातू किंवा सोने असणार आहे. राजाचेच हे कारस्थान असणार हे त्यांच्या झटक्यात लक्षात आले. हे फळ जर आपण खाल्ले तर आपली आयुष्यभराची तपश्चर्या वाया जाईल. ते ऐकून इतर सर्व ऋषींची मलूल दृष्टी बदलून त्यात अंगार भरल्या सारखे झाले. हातातली फळे तिथेच टाकून  ते पुढे मार्गस्थ झाले. त्यांनी ती फळे फोडून सुद्धा बघितली नाहीत. रागाने खाली फेकलेल्या फळातील सुवर्ण आपोआप बाहेर पडले.  अशा तऱ्हेने राजाचा हा डाव तर फसला.

      राजाने चिडून जाऊन  त्यांची हत्या करण्यासाठी त्यांच्या मागे एक कृत्या पाठवली. देवराज इंद्राला जेव्हा हे कळले तेव्हा रूप बदलून तो सप्तर्षींच्या मागे गेला. ती कृत्या जेव्हा सप्तर्षींना मारायला धावली तेव्हा मात्र इंद्राने आपले खरे स्वरूप उघड केले आणि आपल्या वज्राने कृत्येला मारून टाकले.

     इंद्राने प्रसन्न होऊन सप्तर्षींना म्हटले की तुमची ही कठोर सत्व परीक्षा अनंत काळ पर्यंत मानवांना प्रेरणा देत राहील. आता पासून तुम्हाला कधीच तहान भूक लागणार नाही. असा आशिर्वाद देऊन इंद्र गुप्त झाला. त्यामुळे महिनोंमहिने सप्तर्षींना जाळणारी तहान भूकच नाहीशी झाली.

      आपल्या पुराणांमध्ये सप्तर्षींची वेगवेगळी नावे येतात, म्हणजे सात नावांचे वेगवेगळे संच येतात.  वर सांगितलेला एक संच सध्या माहिती आहे. काही ठिकाणी भृगु,अत्री, अंगिरस, वसिष्ठ, पुलह, पूलस्त्य आणि क्रतू अशीही नावे येतात. असे म्हणतात की प्रत्येक युगात वेगवेगळे ऋषी सप्तर्षी पदाला पोहोचलेले असल्याने वेगवेगळी नावे येतात. सप्तर्षी पदाला पोहोचणे म्हणजे मानव जन्मातील सगळ्यात कठीण परीक्षा पार पाडणे. अत्यन्त अवघड अशी परीक्षा दिली तर सप्तर्षी पदाचा मान मिळतो.

लीना दामले.

Share :