Being Woman

blog img

‘पौर्णिमा गायकवाड’

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय     

         जिच्याकडे बघताक्षणी देश प्रेमाची स्फूर्ती चढते, मन अभिमानाने उंचावते, एक आदरयुक्त भीती मनात तयार होते अशी ‘खाकी वर्दी’. जिला बघून मन त्रिवार वंदन करते आणि नतमस्तक होते. पोलिसी क्षेत्र जिथे गेल्या काही वर्षात महिलांची संख्या वाढत आहे पण काही वर्षांपूर्वी त्यांनी ठरवलं आणि खडतर मेहनत घेत, अथक प्रयत्नातून पोलिसी क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या पुण्याच्या पोलीस उप आयुक्त ‘पौर्णिमा गायकवाड’. 

          घरात वडील पोलीस अधिकारी त्यामुळे या क्षेत्राचे कळत- नकळत संस्कार त्यांच्यावर घडत गेले. आपण समाजासाठी काही करू शकलो तर? कोणाच्या अडी-अडचणीला आपली मदत झाली तर ? या गोष्टी जर आपण करू शकलो तर त्या सारखी दुसरी भाग्याची गोष्ट नाही हा विचार करून त्यांनी या क्षेत्रात यायचा निर्णय पक्का केला. घरातूनही त्यांच्या या निर्णयाचे स्वागत झाले. एकएक परीक्षा देत, ट्रेनिंग घेत त्यांनी त्यांच्या ध्येयाकडे पावलं टाकली. ट्रेनिंगच्या ठिकाणीही आपण एक मुलगी आहोत आपल्याला हे जमेल का? आपला फिटनेस टिकेल का? अशा कोणत्याही प्रश्नांनी डगमगून न जाता फक्त मेहनत, चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत यश संपादन केलं. 

       खाकी वर्दी अंगावर चढवल्यावर एका वेगळ्याच जबाबदारीची जाणिव मनात निर्माण होते. मातीचा रंग हा खाकी असतो मातकट असतो. या भूमीशी तुमची नाळ जोडली गेली आहे. तिच्या विषयी तुमची एक कृतज्ञता आहे, तिचे ऋण आहेत याची पदोपदी काम करताना तुम्हाला जाणीव व्हावी यासाठी या वर्दीचा रंग खाकी आहे मातीशी जुळणारा आहे ही ट्रेंनिग घेताना शिकवलेली शिकवण पौर्णिमा मॅडम पदोपदी जपत आहेत आणि देशसेवेच समाजसेवेच हे व्रत अविरत सांभाळत आहेत. 

      आपल्या समाजात आजही असा समज रुजलेला आहे की लग्नानंतर मुलीचं करिअर संपत पण पौर्णिमा गायकवाड या सगळ्यासाठी एक उत्तम आदर्श आहेत कारण त्यांच्या करिअरची अर्थात पोलिसी क्षेत्रात त्यांची प्रवेश हा लग्नानंतर झाला. त्यांचे पती श्री. सतीश कंधारे. हे जम्मू काश्मीरमध्ये IPS आहेत. सध्या लडाख UT मध्ये Director General of Police and the Chief of Police म्हणून कार्यरत आहेत. मला पोलीसमध्ये का यायचं आहे, त्यामागे माझी काम करण्याची काय प्रेरणा आहे हे त्यांनी घरी सांगितलं आणि त्यांच्या या निर्णयाला घरातून पाठिंबा मिळाला. कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड मनात ठेवून काम करू नका, समाज काय म्हणेल, कोण काय म्हणेल याचा विचार न करता तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करत रहा एक दिवस यश नक्कीच मिळत हेच त्यांच्या संपूर्ण प्रवासातून दिसून येते. 

         एक महिला म्हणून या क्षेत्रात काम करणं ही सोपी गोष्ट नाही. २४*७ तुम्हाला जागरूक राहावं लागतं. रोजचा दिवस हा नवीन काहीतरी घेऊन येत असतो. रोज नवीन टास्क, रोज नवीन केसेस पण पौर्णिमा मॅडम कधीच थकत नाहीत कधीच थांबत नाहीत. जिथे त्यांच्या मदतीची गरज आहे तिथे त्या कोणताही कसलाही विचार न करता धावून जातात. क्रिमिनल डिपार्टमेंटला काम करताना अत्यंत खडतर गोष्टींचा सामना त्यांनी केला आहे किंबहूना करत आहेत. 

        त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी विविध पदे भूषविली आहेत. प्रत्येक जबाबदारी ही सक्षमपणे पेलली आहे. अनेक प्रसंग असे आले की जिथे त्यांना होय मी एक महिला आहे आणि मी हे क्षेत्र निवडले आहे याचा त्यांना मनोमन खूप अभिमान वाटतो. अनिश्चित वेळाची ड्युटी असल्याने अनेकदा त्यांच्या लहान लेकीला जेवढा द्यायला हवा तेवढा त्यांना वेळ देता येत नाही याची खंत त्यांच्या मनात आहे. पण कर्तव्य पहिले हे त्या तंतोतंत जपतात. संपूर्ण कुटुंबाकडून त्यांना उत्तम पाठिंबा मिळाला आहे आणि म्हणूनच आजपर्यंत कमावलेले यश हे माझ्या एकटीचे नाही यात माझ्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे हे त्या आवर्जून सांगतात. आजपर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 

        महिला ही दुबळी नाही, ती सक्षम आहे ती दुर्गा आहे एकाचवेळी अनेक गोष्टींशी सामना करण्याची तिच्यात ताकद आहे फक्त कमी असते ती निश्चय करण्याची आणि आत्मविश्वासाची. थांबू नका, स्वप्न पहा, नुसती पाहू नका तर ती पूर्ण करण्यासाठी ध्येय निवडा आणि ते साध्य करण्यासाठी मेहनत घ्या एक दिवस यश नक्कीच मिळतं  हेच त्या आवर्जून सांगतात. 

        आजपर्यंतच्या या प्रवासात मागे वळून बघताना आपण  बिइंग अ वुमन म्हणून हे क्षेत्र निवडलं याचा विलक्षण आनंद त्यांना नेहमीच होतो. बिइंग वुमन पाक्षिक स्त्रियांसाठी उत्तम कार्य करत आहे. एकमेकींना साथ देत सहकार्य करत पुढे जाण्यासाठी मदत करत आहे याचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

Share :