नमस्कार मैत्रिणींनो
मागच्या लेखात आपण मानवाला नकोसे वाटणारे दु:ख, वेदना, विषाद याबद्दल समजून घेतले.अत्यंतिक दु:खमय आणि द्विधा अवस्थेत असणारा अर्जुन. एक पराक्रमी क्षत्रिय असूनही युद्ध करण्यास तयार होत नाही.स्वत:चेच नातेवाईक, जिवलग मित्र यांच्यावर शस्त्र उगारण्याच्या कल्पनेनीच व्यथित झालेल्या अर्जुनाची ही दु:खी अवस्था विकोपाला जाते.अर्जुनाला अशा स्थितीत पाहून भगवान श्रीकृष्णही अचंबित होतात. दु:खानी कोमेजून गेलेल्या अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करावं या उद्देशानीच भगवंतांनी केलेला उपदेश म्हणजेच ‘श्रीमद्भगवद्गीता’.
या उपदेशामध्ये सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायात मानवी देह, आत्मा यांचा परस्परसंबंध तसंच आत्म्याचं नित्य आणि शाश्वत असणं आणि शरीराचं नश्वरत्व याचं अप्रतिम वर्णन केलेलं आढळतं. तसं पाहिलं तर जन्म मृत्यूचं गूढ कोणालाच उलगडत नाही. आपण जन्माला येतो ते कशासाठी? आयुष्य जगण्याचं प्रयोजन काय? आणि मृत्यू पावतो म्हणजे नेमकं काय होतं? असे विविध प्रश्न आपल्याही मनात येतच राहतातकी.त्यात जसजसे आपण मोठे होत असतो तसतसं आत्मा, परमात्मा, मोक्ष याबद्दलची आपली उत्सुकता, कुतुहल वाढतचं असतं.
शरीरम् आद्य खलु धर्मसाधनम्|| आपलं शरीर हे धर्माचरण करण्यासाठी असलेलं एक साधन आहे असं म्हणतात. परंतु शरीर म्हणजे काय हे आधी पाहू या.
शीर्यते तद् शरीरम्|| शीर्यते म्हणजे जे झिजतं ते शरीर. शरीराची व्याख्या पाहिली असता असं लक्षात येतं की शरीर हा शब्दच जणू झिजणे, संपून जाणे या अर्थानी तयार झालेला आहे. याचाच अर्थ असा की देह अथवा शरीर ही कायम स्वरुपी टिकणारी वस्तू नसून त्याला विशिष्ट मर्यादा आहे, आयुष्य अथवा कालावधी आहे.
आत्मनो भोगायतनम् शरीरम्|| अर्थात आत्म्याचे बरे वाईट भोग भोगावयाचे स्थान अशीही शरीराची व्याख्या केली जाते.
दोषधातुमलामूलम् हि शरीरम्|| अर्थात वात, पित्त, कफ हे तीन दोष. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र हे सात धातू आणि मूत्र, पुरीष, स्वेद हे तीन मल यांच्या आधाराने राहते ते शरीर. असे वर्णन आयुर्वेदात आढळते.
मात्र देह हा केवळ हाडांचा सांगाडा, रक्ता-मांसांचा गोळा, मूत्र-पुरीषाची खाण नसून त्याला देवतांचे आयतन किंवा स्थान समजावे असे यजुर्वेद सांगतो. अथर्व वेदात मानवी देहाचे वर्णन देवांची नगरी असे केले आहे.
अष्टावक्रा नवद्वारा देवानां पूरयोध्या|
तस्या हिरण्यय: कोश: स्वर्गो ज्योतिवावृत||
तस्मिन् हिरण्यये कोशे त्यरे त्रिप्रतिष्ठिते|
तस्मिन् यद्यक्षमात्मन्वत् तद् ब्रह्मविदो विदु|| (अथर्व १०.२.३१-३२)
असं हे मानवी शरीर आणि त्यामध्ये साक्षी भावानी असलेलं आत्म्याचं अस्तित्व जर जाणलं तर पुढचे मार्ग अधिक सोपे होतात. या शरीरामध्ये अंतर्भूत इंद्रिये त्यांचे विषय तसंच अहंकारादी भावांमधून मनुष्य आत्मज्ञानापासून लांब राहतो आणि स्वत:चं शरीर हेच आपण स्वत: आहोत अशा भ्रामक कल्पनेनी मोहमय होतो. या नश्वर देहाच्या माध्यमातूनच परब्रह्म प्राप्ती करून घ्यायची असते, याचा त्याला विसर पडतो. देहातूनच देहातीत अवस्थेत जाऊन मोक्ष मिळवायचा असतो आणि याचसाठी देह अर्थात शरीराचं अस्तित्व अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात,
येह लोक आणि परलोक|
देह्याकरिता सकळ सार्थक||
देहेविण निरर्थक| सकळ काही||
देह सकळांमध्ये उत्तमु|
देही राहिला आत्मारामु||
सकळां घटी पुरूषोत्तमू|
विवेकी जाणती|| (दासबोध १८.४.८ व १८)
असा हा देह आणि त्यातील आत्मा
देह जणू आत्म्याचे वस्त्र|
एक सोडोनी दुसरे धारण|
स्वीकारतो तो अगदी सहज|
वेळेची घे हे समजून||
असे भगवंत अर्जुनाला म्हणाले.
डॉ. ज्योती रहाळकर