Being Woman

new year

‘ दरवर्षी तेच तेच ‘

वर्ष काय येतात जातात. काळानुसार बदल होत जातात. संस्कृती, परंपरा, शिक्षण पध्दती अजून अशा असंख्य गोष्टी वर्षागणिक बदलत जात असतात. नवनवीन टेक्नॉलॉजी येत राहते. काल आज जूनं झालेलं असतं तर वर्ष बदलल्यावर बघा की किती किती गोष्टी बदलत असतील. नेहमी वर्ष संपत आलं की मग काय नवीन वर्षीचा काय प्लॅन? हे सगळीकडे ऐकू येणार वाक्य. मग काय नवीन वर्षावर येणाऱ्या जोक्स ना तर उधाणच येत नाही का…गंमतीचा भाग जरा बाजूला सारुयात. नवीन वर्षात संकल्प जरूर करावेत पण ते मागच्या वर्षीचेच असू नयेत नाहीत मग आपण आणि राजकीय आश्वासन यात फरक काय राहणार हो…नवीन संकल्प आखा. जुने का पूर्ण झाले नाहीत याचा अभ्यास करा. कुठे कमी पडलं, काय राहील हे तपासून घ्या. बघा उत्तर सापडेल आणि ज्या चुका सरत्या वर्षात झाल्या गेल्या त्या पुढच्या वर्षात टाळा. काहीतरी टार्गेट नक्कीच आखा नाहीतर काय आला दिवस गेला असं करत परत वर्ष संपताना आठवतं अय्या हे राहिलंच की. सण- उत्सव येतंच राहणार, जग झपाट्याने पुढे जात राहणार, बदल होत जाणार, मानसिकतेत- विचारात फरक पडत जाणार हे सगळं स्वीकारण्याची ताकद ठेवत चला म्हणजे आपोआप पुढच वर्ष आनंदात जाईल. मुळात ना एक गोष्ट करा. नुसते मोटिव्हेशनल मेसेज ऐकण्यापेक्षा कृती करा. फिटनेस चे फालतू जोक्स फॉरवर्ड करण्याआधी जरा स्वतःत डोकावून पहा. मी आहे का फिट अन फाईन की खरंच मला गरज आहे येत्या वर्षात स्वतःच्या तब्येतीवर वर्क आऊट करण्याची. स्वतःपासून सुरुवात करा. नवीन तंत्रज्ञान शिका. जगासोबत राहण्याचा प्रयत्न करा. आजचा आलेला क्षण आनंदाने जगा. नाती जपा कारण या वर्षात पाहिलत कधी कोणाची विकेट कुठे कशी जाईल याचा थांगपत्ता लागत नाही. स्वतःतील ‘मी’ जरा बाजूला केला ना की सगळं सोप्पं होऊन जातं. नुसतेच पळत सुटू नका, पैसा कमावण्याच्या नादात जगणं विसरू नका, आज आहे उद्या नाही, उद्या आहे परवा नाही अशी सगळी परिस्थिती. नवीन वर्षात कुठं पर्यंत, धावायचं?किती धावायचं? हे ठरवा. आणि एक सांगू का असं प्लॅनिंग वगरे करून थोडं जगण्याचा पर्यंत करून पाहा. एकदम नाही पण हळूहळू जमेल आणि मग समजेल की हे बाकीचे कसे काय बुवा इतके मस्त जगतात. महिलांसाठी तर खरच निवेदन की बाई यशाने हुरळून जाऊ नकोस आणि अपयशाने खचू नकोस. नव्या वर्षात नव क्षितिजे गाठण्याची जिद्द ठेव. गगनभरारी घे. इतर कोणाशी नाही स्वतःशी स्पर्धा ठेव. नाही म्हणायला शिक पण योग्य ठिकाणी. तू अष्टावधानी आहेस याची जाणीव ठेव आणि नव्या वर्षाची आखणी आख. सरते शेवटी काय हो वर्ष निघून जातात आणि सोबत राहतात त्या फक्त आठवणी. तेव्हा जगाच्या प्रवाहात राहायला शिका वाहत जायला नाही. तो करतो मग मी का नाही. मला पण हे हवं हा अट्टाहास सोडा आणि जगून पहा. वर्ष तर काय हो बदलत जाणारच आहेत. कोणासाठीही ती थांबणार नाहीत. पण ही वर्ष बदलताना आपण जगणं विसरत नाही ना हे पाहण्याची नितांत गरज आहे. आणि म्हणूनच असं वाटतं की संकल्प करा जे मनात असतील ते सगळे करा पण या सगळ्यात स्वतःसाठी, आनंदाने बहरण्यासाठी, मनमुराद हसण्यासाठी, दिलखुलास जगण्यासाठी कुठेतरी जागा मात्र नक्की राखीव ठेवा….

– चित्राली ओक-कुलकर्णी

Share :