अनुरूप – लग्नाच्या पलीकडचे
माणसं जोडणं यांना सहज जमत किंबहूना माणसांची मनं त्यांना वाचता येतात, जपता येतात. म्हणूनच तर ‘लग्न’ हा अनेकांच्या दृष्टीने किचकट कठीण वाटणारा विषय त्या अगदी सहज हाताळतात. केवळ लग्न जुळवणे इतकंच नाही, तर त्या जोडतात दोन कुटुंब, फुलवतात संसार आणि दृढ करतात नात्यांमधील वीण. त्यांनी अनेकांना योग्य जोडीदार शोधून दिला, तर कधीकधी विस्कटलेली नात्यांची वीण पुन्हा घट्ट करून दिली. ‘अनुरूप विवाह संस्थे’च्या सर्वेसर्वा ‘डॉ. गौरी कानिटकर’ लग्न जमवण्यामधील एक अग्रगण्य आणि परिचित नाव.
सतत नवीन काहीतरी करण्याची तीव्र इच्छा, नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची तयारी आणि चेहऱ्यावर कायम प्रसन्न मुद्रा ठेवत प्रत्येकाशी आपुलकीने, प्रेमाने संवाद साधणाऱ्या डॉ. गौरी कानिटकर.
1975 साली अनुरूपची स्थापना केली ती त्यांच्या सासूबाईंनी. बँकेत नोकरी करीत असताना, गौरी मॅडम यांनी आपल्या सासूबाईंना या कामात मदत करायला सुरुवात केली. त्यावेळी आतासारखी टेक्नॉलॉजी प्रचलित नव्हती. त्यामुळे रजिस्टर मेंटेन करणं, आलेल्या माहितीचे अपडेट्स ठेवणं अशा अनेक कामात त्या आनंदाने सहभागी होऊ लागल्या. माणसं जोडणं आणि दुसऱ्यांसाठी जितकं चांगलं करता येईल तितकं करणं या त्यांच्या स्वभावामुळे, त्यांनी बँकेतील नोकरी सोडून पूर्णपणे हा व्यवसाय म्हणून करावा असा विचार केला आणि इथेचं सुरुवात झाली अनुरूपच्या एका नव्या अध्यायाला.
लोकांसाठी नवनवीन काय देऊ शकतो? लग्न जमवणीची पद्धत अधिक सोपी कशी करू शकतो? अशा अनेक गोष्टींचा त्यांनी मागोवा घेतला. लग्न या विषयावरील अनेक गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला आणि अनुरूपकडून सर्वोत्तम अशीच सेवा कशी देता येईल याचे नियोजनही केले.
अनुरूपने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत एक परिपूर्ण वेबसाईट बनवली. या वेबसाईटची संपूर्ण धुरा सांभाळत आहे त्यांचा मोठा मुलगा अमेय कानिटकर. विशेष म्हणजे लग्न जमवणे अर्थात विवाह संस्थेतील सगळ्यात पहिली वेबसाईट बनवली गेली ती अनुरूप कडूनच. अनुरूपचे ऍपही अत्यंत अद्ययावत आहे.
‘अनुरूप विवाह संस्था’ची- “इथे लग्न जमते” ही जरी टॅग लाईन असली, तरी इथे नुसती लग्न जमत नाहीत, तर इथे लग्न खुलतात, बहरतात आणि सुखाचे संसार नांदतात. याचीच पोचपावती म्हणजे आजपर्यंत जवळपास 75 हजारहून अधिक यशस्वी लग्न अनुरूपच्या माध्यमातून झाली आहेत.
लग्न जमले म्हणजे झाले असे नाही, तर एका लग्नामागे जोडले जातात ते परिवार. घरातील पती-पत्नीमध्ये एकोपा असेल, त्यांच्या नात्याची केमिस्ट्री उत्कृट असेल, तर कुटुंबात स्वास्थ्य-आनंद-समाधान नांदते आणि हाच वारसा त्यांच्या मुलांकडे अर्थात पुढच्या पिढीकडे जातो. एका आनंदी आणि सक्षम कुटुंबामुळे एक समाज सक्षम होतो पर्यायाने देशही. म्हणूनच लग्न हा अनेकांच्या दृष्टीने किचकट वाटणारा विषय हाताळताना यातील अनेक बाजूंचा विचार करत समाजासाठी काहीतरी करावे या जाणिवेतून थेट-भेट या कार्यक्रमातून पालकांशी संवाद, सासू- सासरे होताना अशा विविध विषयांवर परिसंवादाचे संस्थेकडून आयोजन केले जाऊ लागले तेही अगदी निःशुल्क. ज्यात डॉ. गौरी कानिटकर या मोलाचे मार्गदर्शन करीत असतात. दरवर्षी जवळपास 100 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
केवळ पुणे किंवा महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही अनेक ठिकाणी अनुरूप जाऊन पोहचले आहे. परदेशातील थेट-भेट कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळतो आहे.
कामाच्या प्रचंड व्यापातही गौरी मॅडमनी त्यांचे छंद, आवडी अत्यंत सुंदररित्या जपल्या आहेत. आर्ट आणि क्राफ्ट यात त्यांना विशेष रुची आहे. नाविन्यपूर्ण गोष्टींचे जतन करणे, घर टापटीप ठेवणे , विविध पुस्तक वाचणे, शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत ऐकणे, नाटकांमध्ये काम करणे ( यात त्यांना अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत), असे अनेक छंद त्या आवडीने सवड काढून जोपासत आहेत. गेली 40 वर्षे त्या आकाशवाणीवर देखील कार्यरत आहेत.
लग्न या विषयी काम करताना त्यांना अनेक गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या, बदलती लग्न संकस्कृती, वाढते घटस्फोटांचे प्रमाण, वाढत्या अपेक्षा एकूणच बदललेली परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न यांची उत्तरे शोधण्यासाठी या विषयासंबंधीत PhD करायचा निर्णय घेतला आणि सन 2019 मध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्यांचा अनेकांना मार्गदर्शनपर ठरेल असा ‘ गेल्या शंभर वर्षातील मराठी नाटक आणि बदलती विवाह संस्था’ हा प्रबंध त्यांनी लिहिला.
अनुरूपच्या माध्यमातून ‘रंग लग्नाचे-लग्नापूर्वीच जाणायचे’, ‘शोध अनुरूप जोडीदाराचा’, ‘लग्नाआधी’ या पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहेत. आज अनुरूप संस्थेच्या यशामागे माझ्या कुटुंबाची मला उत्तम साथ आहे असं त्या आवर्जून सांगतात. संस्थेच्या कामात त्यांची दोन्ही मुले अमेय आणि तन्मय त्यांना सहकार्य करीत आहेत. तांत्रिक बाजू अमेय, तर इव्हेंट आणि अन्य गोष्टी तन्मय पाहतो आहे. लग्नानंतरचे सुखी संसार, आनंदी कुटूंब आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील समाधान यातच कानिटकर कुटूंबियांच्या यशाचे गमक सामावले आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
मुळातच स्त्री ही अष्टावधानी असते. एकाचवेळी अनेक कामे करण्याची क्षमता तिच्यात असते. तिने ठरवलं तर तिच्यासाठी अशक्य, असाध्य असे काहीच नाही. फक्त सगळं साध्य करत असताना, आपल्या माणसांना सोबत घेऊन जाण, एकमेकांना मदत करणं, जिभेवर खडीसाखर व डोक्यावर बर्फाचा खडा ठेवणं गरजेचं असतं अस डॉ. गौरी कानिटकर आवर्जून सांगतात.
बिंइंग वुमन हे पाक्षिकही याच धर्तीवर काम करीत आहे. आपल्या सख्यांना, मैत्रिणींना सुंदर व्यासपीठ देत आहे. त्यांच्या व्यवसायाला, आवडीला एक मुक्त व्यासपीठ देत आहे याचे गौरी कानिटकर यांनी विशेष कौतुकही केले. पाक्षिकाच्या पुढील वाटचालीसाठी टीम बिइंग वुमनला त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
शब्दांकन – चित्राली ओक, पुणे