व्यथेचा जोगवा….
एक तीस जानेवारी दोन हजार एक वीस रोजी इलाही जमादार यांचे निधन झाले.आजच्या भागात आपण त्यांच्याच शेरांचा आस्वाद घेऊया.
घेतला झोळीत माझ्या मी व्यथेचा जोगवा
एकदा हातात माझ्या हात तू देऊन जा
सांजवेळी सोबतीला सावली देऊन जा
भैरवी गाईन मी तू मारवा गाऊन जा
असं म्हणणाऱ्या इलाहींकडे वेदनेचं संगीत शब्दातून मांडण्याचे कसब होतं. कोणत्याही वादात न अडकता संवेदनांचे रेशीम धागे गझलेतून गुंफायचे कौशल्य त्यांना प्राप्त होतं.
आरशाला भास म्हणालो, चुकलेका हो?
धरतीला इतिहास म्हणालो, चुकलेका हो?
चिरंजीव वेदना अंतरी दरवळणारी
जखमांना मधुमास म्हणालो, चुकलेका हो?
चौदा वर्षे पतीविना राहिली उर्मिला
हाच खरा वनवास म्हणालो, चुकलेका हो?
मरण्या आधी नाव सांग त्या हत्याऱ्याचे
मी त्यांना विश्वास म्हणालो, चुकलेका हो?
अशा सध्या शब्दात ते लिहायचे. ही सोपी शैली हेच त्यांचे बलस्थान होतं. सुरेश भटां नंतर गझलेच्या रोपट्याचा वटवृक्ष करण्याचं काम त्यांनी तहहयात केलं. ‘गझलक्लिनिक’ मधून त्यांनी अनेक लिहित्या हातांना शब्दांची जाण आणि गझलचे भान दिले. गझलेमध्ये त्यांनी अनेक वेगवेगळे प्रयोग केले एक ओळ उर्दू आणि एक ओळ मराठी अशा स्वरूपाची गझल त्यांनीच लिहिली.
एसनमतू आज मुझको खूबसूरत साज दे
येउनी स्वप्नात माझ्या तू मला आवाज दे
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलाय वार ज्याने तो मोगरा असावा
असा शेर लिहिणाऱ्या इलाही ह्यांचा पिंड
अस्सल गझलकारा चा होता. अनुराग, अनुष्का, अभिसारिका, गुफ्तगू, जखमा कशा सुगंधी, दोहे इलाहीचे, भावनांची वादळे, मुक्तक या मराठी काव्य आणि गझल संग्रहां बरोबरच त्यांचे हिंदी अल्बम आणि संगितिका, नृत्य नाट्य प्रसिद्ध आहेत. बदलते सामाजिक वास्तव, सांस्कृतिक मूल्यांतला संघर्ष आपल्या शब्दात मांडला.
अनेक कवि संमेल ने मुशायरेयात त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा बाहेर स्वतंत्र काव्य वाचनाचे आणि गझलेच्या संदर्भातील प्रश्नोत्तरे यांचे जाहीर कार्यक्रम ते करत असत. ‘महफिल-ए-इलाही’ या नावाने उर्दू आणि ‘जखमा कशा सुगंधी’ नावाने त्यांनी मराठी काव्य वाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यता प्राप्त कवी होते.
*हे का कुणी फुलांना सांगायला हवे
त्यांनी कसे ऋतूंशी वागायला हवे*
अशा तरल शब्दात आपल्या भावना मांडणारे इलाही
*या वादळात माझ्या पुसल्या जरी दिशा
तारूतुझे किनारी लागायला हवे*
अशी स्वत:ची फिकीर न करता असा सतत दुसऱ्याचा विचार करणारे होते.
*विश्वास टाकुनी हे जग शांत झोपलेले
मी तांबडे फुटे तो जागायला हवे*
असे भान असणारे होते.
शेवटच्या दिवसांमध्ये मात्र ते एकटे होते.
“कसे थोपवू उल्के समहे कोसळणारे एकाकीपण” असा आर्त सवाल त्यांनी केला.
*काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा*
पण खचणारे नव्हते ते! उलट काळजात सांभाळलेल्या वेदनेचीच त्यांना काळजी होती. ‘अनाथ होईल जगीवेदना माझ्यानंतर’ असे म्हणणारे इलाही आपल्या मूळ विश्वात परतले आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!
स्वाती यादव
9673998600
swash6870@gmail.com