Being Woman

गझल

‘गझलियत भाग ४’

आपली गझलशी आता छान मैत्री झाली आहे.  तिच्या परिभाषेतील शब्द आपण उदाहरणांनी समजून घेतले.  रदीफ, काफिया जमीन, उला मिसरा,  सानी मिसरा, मतला, मक्ता हे शब्द आता आपल्या तोंडवळणी पडले.

आता आपण गझलमधला सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत ज्या  ला म्हणतात ‘अलामत’.  आपण मागे पाहिलेच की गझलेतील प्रत्येक शेरामध्ये जो काफिया असतो (यमक असणारा शब्द) त्या कवाफीमधील शेवटाकडून समान असलेल्या अक्षरांच्या आधी जे अक्षर येते त्याचा स्वर म्हणजे अलामत होय.

तांत्रिकदृष्ट्या गझल सुंदर वाटते ती तिच्या नादामुळे. तिची नाद मधुरता ज्यामुळे टिकून राहते तो असतो काफियामधील एक विशिष्ट स्वरच! तोच या गजलेचे सौंदर्य सांभाळून ठेवण्याचे काम करत असतो.  यालाच सुरेश भटांनी स्वरचिन्ह असं म्हटलं आहे.  यालाच उर्दूमध्ये अलामत असं म्हटलं जातं.  ही अलामत सांभाळणे हेच खूप अवघड काम असते कारण ही अलामत सांभाळली गेली नसेल तर तो काफिया त्या विशिष्ट गझलमध्ये चुकीचा ठरतो.  आता याचा अर्थ आपण काही शेरांच्या उदाहरणांनी पाहू.

देव ताजा की शिळा माहीत नाही

का तरी भाळी टिळा माहीत नाही

राहिलो  आजन्म श्रावण मी परंतू  

कोण होता घन निळा माहीत नाही

जीव आंब्याची डहाळी होत जातो

काय गाते कोकिळा माहीत नाही

पोट फुटल्यासारखे आभाळ गळते

मारला कोणी विळा माहीत नाही

सतीश दराडे यांच्या या गझलेत ‘माहीत नाही’ ही रदीफ आहे. शिळा टिळा निळा कोकिळामधला किळा विळा हे कवाफीचे शब्द आहेत. यातील समान अक्षर प्रत्येक काफियामध्ये ‘ळा’ असून त्याच्या अलीकडील स्वर ‘इ’ हा आहे म्हणजेच या गजलेतील अलामत आहे इ . म्हणजेच या गझलमध्ये फळा हा काफिया होऊ शकणार नाही कारण फळामधल्या फ मध्ये अ हा स्वर आहे आणि आपल्याला अलामत ‘इ’ हीच सांभाळली पाहिजे.

एखाद्या गझलेत येत देत हवेत बेत असे कवाफी असतील तर त ह्या  समान अक्षराच्या अलीकडील ए हा स्वर ही अलामत आहे.  म्हणजे आता त्या गझलमध्ये फुरसत मिळकत हे कवाफी बसणार नाहीत कारण आहे अलामत. अलामत हा काफियाचाच भाग असला तरी अलामत सांभाळली न गेल्यास गझल चुकली असे मानले जाते.

बाजार मार आधार फार यात ‘आ’ ही अलामत आहे हे तुम्ही बरोबर ओळखलेत.

पुढच्या भागात काही सुंदर शेर अभ्यासू.

स्वाती यादव.
13-1-2021 .
9673998600

Share :