Being Woman

गझल

‘गजलियत : भाग ९’

गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! शुभेच्छांच्या माध्यमातून एक सकारात्मकतानिर्माण करायलाच हवी कारण एक वर्ष होऊन गेलं तरीही आपण अजून कोरोंना या महामारीशी लढतच आहोत.  एक सामान्य विषाणू आपल्या सगळ्या वैज्ञानिक प्रगतीला आव्हान देतो आहे आणि यात अजून यश येत नाही म्हणून आणि झालेल्या पडझडीने निराशा येते.

वेदनेच्या गर्भातूनच दर्जेदार काव्य उत्पत्ती होते हे एक अटळ सत्य!!!  सुप्रिया जाधव यांच्या ‘’कोषांतर’या गझलसंग्रहातील काही शेर आपण आज पाहणार आहोत. वयाच्या ऐन मध्यावर पतीचे जाणे ही असह्य दु:खसहन करीत आपली तगमग त्या गझलेत व्यक्त करतात. निसर्ग इतिहास ऋतू फुले हे सगळं त्यांच्या गजलेत प्रतीकात्मक अर्थ घेऊन येतं आणि उत्कृष्ट शेर साकारला जातो.  त्यांचा शेर मनाच्या तळाशी रुतून बसतो आणि चिंतन करताकरता तो अधिकाधिक समजत जातो.

धाडू नको आमंत्रणे बेभानता नाही बरी

उद्ध्वस्त होण्यावादळे नेतात का कोणी घरी?

माझ्या तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे

तू देव गाभाऱ्यातला मी देवळाची पायरी

असे हे नाते.

युगांचा सोसल्यावरती उन्हाळा

हवा झाली जराशी पावसाळी

हळद चढली धरेवरती उन्हाची

बरस ना पावसा तू दे नव्हाळी

अशा निसर्ग प्रतिमा घेऊन त्यांचा शेर येतो.

नको लावूस परिमाणे तुझी तू

निराळा तू तशी मीही निराळी

असं रोखठोक सांगणारा शेरही त्या लिहितात. 

दूर क्षितिजापल्याड अविरत कोसळतो तो

ऐन श्रावणामध्ये होते लाही लाही

बेरंग उरले शेवटी आयुष्य हे

वेळीच नाही स्पर्शली फुलपाखरे

ह शेर एखाद्या संधीच्या बाबतीतही पटतो.

उर्मिला विरहात जळते एकटीने

जानकीचा गाजतो वनवास नुसता

असा पुराणाचा संदर्भही चपखल वापरतात.

शहरीकरण झाले तहानेचे

गावातली गोडी तळी गेली

परिपक्व निर्णय घेतला आपण

इच्छा चिरडली कोवळी गेली

हा जगाचा व्यवहार त्या नेमकेपणाने सांगतात.

मनाचे फूल माझे…. माळरानावर उमललेले

कुणी नामाळले,  नाही कुणावर वाहता आले मनाजोगे जरी नाही जिण्याला हाकता आले

मनाला स्वैर इच्छांचे जनावर दाबता आले

ही जाणीव आहेच.

उपेक्षांचे तिच्या पायात काटे

अपेक्षांचे तिच्या ओझे शिरावर

युगांची सोसली असणार घुसमट

टिपेला पोचला होता तिचा स्वर

असे स्त्री-जाणिवांचे शेर त्या बेमालूमपणे लिहून जातात.

अपेक्षा ठेवल्यावरती अपेक्षाभंग ठरलेला

तुझ्या दुर्लक्षण्याबद्दल कुठे तक्रार केली मी

म्हणाला तो कधीही हाक देतू संकटांमध्ये

विनवणी संकटांची रोज अपरंपार केली मी

हे शेर जेव्हा शांतपणे वाचू तेव्हा त्यातली वेदना कळते.

किती अर्थ निघतात या बोलण्याचे

तरी पाहिजे ते कुठे बोलते मी?

तुला भेटण्याचा मला हक्क नाही

तशी तर मलाही कुठे भेटते मी?

असे आत्ममग्न शेर लिहून त्या वाचकांनाही चिंतनास भाग पाडतात.

सुप्रियाताई, उदंड लिहीत रहा!!!

स्वाती यादव

9673998600 

Share :