Being Woman

गझल

‘गजलियत भाग ८’

आयुष्य जन्म घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते श्वास संपेपर्यंत इतक्या मर्यादित लांबीचं आपलं आयुष्य!

‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!’ असं बहिणाबाईंनी म्हणून ठेवलेलं आहेच.

जीवनाला दान द्यावे लागते

श्वास संपेतो जगावे लागते..!

या एकाच आयुष्यात आपल्याला जगाचे वेगवेगळे अनुभव येतात. या अनुभवांनी कधी चुकत कधी  शिकत,  कधी पडत कधी सावरत आपण जगत राहतो.

धडे जीवनाने शिकावेत कुठवर?

नवे प्रश्न मी सोडवावेत कुठवर?.. असं  किंवा

जगासमोर आपल्याला आपले त्रास सोसून, दु:ख्ख  लपवून हसावे लागते त्यावेळी

शीण  येतो जीवनाला झेलताना

सोसतांना, लपवतांना, हासताना

असं आपल्याला वाटतं हेही खरं!

खरंतर सुख क्षणभंगूर आहे आणि दुःख चिरंतन आहे.  ते आपली पाठ सोडत नाही, आपल्याला सदैव साथ देतं.

जखमा सोसत हसणारे

तेच खरेतर जगणारे

असं म्हणावसं वाटतं.

म्हणून आपण आपलं दुःख आपल्यापुरतं ठेवावं.

ते पांघरावे फक्त एकांतामध्ये

जे दुःख असते रेशमी अन भर्जरी

जीवन कसले हा तर चकवा

जिवंत मी ही निव्वळ अफवा

पण जेव्हा आपल्यापेक्षा जास्त अडचणी, जास्त संकटांना तोंड देणाऱ्या व्यक्तींशी आपला परिचय होतो तेव्हा आपल्याला जाणवतं की अरेरे, आपलं आहे हे खूप बरं आहे.

खरं तर आपलं वय झालं की आयुष्य खूप वेगळं वाटायला लागतं कारण काळ झपाट्याने बदलत असतो.

आपल्या गत आयुष्याकडे पाहताना आपल्यालाच एक वेगळी दृष्टी येते. वयानुसार अधिक परिपक्व होत जाते.  सिंहावलोकन करताना घडून गेलेल्या घटनांनी आपल्याला बरंच काही शिकवलेलं असतं.

ओळखू शकले न मी ह्या माणसांना 

दूरच्यांना.. जवळच्यांना..  आपल्यांना.. ..!

असं वाटायला लावणारे कित्येक प्रसंग आठवतात.

खरं तर जगणं प्रत्येक श्वासाइतकंच नवीन असतं.  मात्र आपण त्याचं चाकोरीत रूपांतर करता कामा नये.  आलेला प्रत्येक क्षण उत्साहाने जगलो, आशेने पाहिलं तर जगण्यातमौज आहे. संकटे येणारच पण त्यावर मात करण्याची जिद्द ठेवूया.

पुन्हा एकदा झुंजण्याचा इरादा

तुला जीवना जिंकण्याचा इरादा

काळ हातातून वाळूप्रमाणे निसटून जात असतो आणि आयुष्य त्याच्या वेगाने धावत असतं.

जे तेव्हा केले ते आज करावे कैसे

फुलपाखरामागे आज पळावे कैसे

ओघळते अश्रूही झाले फिक्कट आता

रंग जुन्या चित्रातून आज भरावे कैसे

असं विचार करत आपण निश्चय करतो की,

वर्तमानासवे जायचे पुढे

मागचा काळ तू आठवू नको

पैलतीरी अता जायचे मला

हाक देऊन तू थांबवू नको

मंडळी संध्याछाया येणारच! पलिकडची हाक येणारच.

सूर्यास्त पश्चिमेचा बघण्यात मौज आहे

सांजावले तरीही जगण्यात मौजआहे..

ही मजा लुटता यावी म्हणून ‘सगळ्यात असूनही काशतच नसणं’ आले पाहिजे.

पानापरी अळूच्या निसंग जन्म जावा

असूनी जगात साऱ्या नसण्यात मौज आहे

मंडळी आयुष्य जगण्यात हीच तर मौज आहे.

आज आपण संगीता जोशी यांच्या काही शेरांचा  आस्वाद घेतला.

पुढच्या भागात नवीन विषय! नवीन गझलकार!!!

स्वाती यादव

9673998600

swash6870@gmail.com 

Share :

1 thought on “‘गजलियत भाग ८’”

  1. Wow, superb weblog structure! How lengthy have you been running a blog for?

    you make running a blog look easy. The whole glance of your website is magnificent, let alone the content!
    You can see similar here dobry sklep

Comments are closed.