Being Woman

blog img

‘कॅलिडिओस्कोप’

माधुरी सहस्रबुद्धे 

बालरंजनपासून सुरू झालेला त्यांचा रंजक प्रवास, एक यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांची घडलेली वाटचाल आणि अपघाताने अनेकांना किचकट वाटणाऱ्या राजकारणाच्या क्षेत्रात, त्यांचा झालेला प्रवेश व त्यातून त्यांनी केलेली यशस्वी कामगिरी. व्यक्तिमत्व एक पण त्याच्या विविध बाजू अत्यंत कुशलतेने, आनंदाने साकारणाऱ्या माधुरी सहस्रबुद्धे. 

लहानपणी घडणारे संस्कार हे आयुष्यभराची शिदोरी ठरतात, माणूस म्हणून घडवितात आणि कार्यक्षम करतात. हल्ली मुलांना खेळण्यासाठी हक्काची जागा, मोकळे मैदान नसते मग ही मुले सशक्त होणार तरी कशी ? हाच विचार करून लहान मुलांसाठी माधुरी ताईंनी स्थापनाकेली “बालरंजनकेंद्र” यासंस्थेची. 

4 मुलांपासून सुरू झालेल्या या संस्थेत आज मि तीला 350 हून अधिक मुले सुसंस्कारीत होत आहे. इथे आलेल्या मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जातो. मुलांमधील सुप्तगुण शोधून त्यांना व्यासपीठ दिले जाते. 

केवळ मुलेच नाही तर दरवर्षी पालकांसाठीही काही खास कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.  

सध्या या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन माध्यमातून हे वर्ग सुरू आहेत. त्यात व्यायाम व खेळांबरोबरच अगदी भाजी निवडण्यापासून ते घरात मदत कशी करायची ? अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात.

बालरंजन च्या या प्रवासात अनेक सुंदर अनुभव त्यांच्या गाठीशी बांधले गेले. त्यातील एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे त्यांनी पौर्णिमेच्या रात्री राजाराम पूल ते सिंहगड पायथा अशी, मुलांच्या सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेत पायी सहल काढली होती. त्यात त्यांनी मुलांचे निसर्गाशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला. 

माधुरी ताईंनी त्यांच्या अत्यंत बोलक्या आणि हसत मुख स्वभावातून मुले आणि पालकांशी अकृत्रिम नाते जोडले आहे. म्हणून तर आजही कितीही मोठे झाले, यशस्वी झाले तरी पहिला आशीर्वाद हाताईंचा घ्यायला ग्राऊंडवर अर्थात बालरंजन मध्ये मुलांची पावलं आपोआप वळतात हेच बालरंजन च्या यशाचे गमक. 

एकीकडे मुलांना घडवित असताना, त्यांनी कौटुंबिक पिठांच्या व्यवसायातही आपले योगदान दिले. 

4 पिठांपासून सुरू झालेली आणि आता नावाजलेली “सकस” कंपनी आज 64 हून अधिक खाद्यपदार्थ निर्यात करते. सर्वोत्तम गुणवत्ता, उत्कृष्ट चव आणि रास्त किंमत यामुळेच आज सकस घरोघरी लोकप्रिय आहे. केवळ पुणे नाही तर भारताबाहेरही सकसच्या पदार्थांना जोरदार मागणी असते. सकसच्या या यशात संपूर्ण सहस्रबुद्धे कुटुंबाचा एकत्रित असा मोलाचा वाटा आहे, हे त्या आवर्जून सांगतात. 

कोणत्या ही गोष्टीची सुरुवात करायची तर why not me? हा प्रश्न  माधुरी ताईने हमी स्वतःला विचारतात. “करून तर बघू” हा सात अक्षरी मंत्र त्या अवलंबितात. कदाचित म्हणूनच असेल, जेव्हा समाजात परिवर्तन घडावेयासाठी सुशिक्षित लोकांनी राजकारणात आले पाहिजे असे जेव्हा त्यांना वाटले, त्यावेळी त्याची सुरुवात कोणीतरी करण्यापेक्षा आपल्यापासून करायला काय हरकत आहे ? असे म्हणत त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

 मुळातच आपण काहीतरी करूया ही त्यांची आंतरिक भावना त्यांना या क्षेत्रात घेऊन आली असावी. पहिल्याच निवडणुकीला त्यांना लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आणि बहुसंख्य मतांनी त्या नगरसेविका म्हणून कार्यरत झाल्या. या काळात त्यांनी असंख्य लोकहिताची कामे केली. संपूर्ण पुणे शहरात त्यांचा वॉर्ड हा स्वच्छतेच्या बाबतीत Clean & Green Ward म्हणून 76 प्रभागांपैकी पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. 

स्वतः दुचाकीवर फिरून परिसराची पाहणी करत त्यांनी सातत्याने योग्यती अंमलबजावणी केली. अनेक रखडलेले प्रश्न त्यांनी मार्गी लावले. 

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचा कायापालट त्यांच्या प्रयत्नातून साकार झाला. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून त्या कार्यरत आहेत. 

माधुरी ताईंना त्यांच्या या संपूर्ण प्रवासात कुटुंबीयांची उत्तम साथ लाभली आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयात घरातील सर्वजण नेहमीच त्यांना पाठिंबा देत असतात. एक उत्तम गृहिणी, सृजनशील आई, प्रेमळ आजी आणि कर्तव्यदक्ष स्त्री या सगळ्या भूमिका त्या लीलया पार पाडतात. 

स्त्री ही एकाचवेळी अनेक भूमिका निभावत असते. एकाचवेळी तिला शंभर आघाड्यांवर काम करायचं असतं. हे सगळं पार पाडत असताना, एक गोष्ट प्रत्येक स्त्रीने कटाक्षाने पाळली पाहिजे ती म्हणजे तिने *इगो* सोडून दिला पाहिजे. कधीही कोणत्याही ठिकाणी तो मध्ये आणता कामा नये आणि तरंच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो. 

सगळ्यांना सामावून घेत आपण पुढे जायला पाहिजे. मानापमान सोडून दिला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात येताना आपण आपलं पद, प्रतिष्ठा ही उंबऱ्याच्या बाहेर ठेवूनच घरात प्रवेश करायचा. सगळ्यांना समान वागणूक दिली की आपोआप घर आनंदी राहतं. 

यश-अपयश, मान-अपमान हे स्वीकारता आले पाहिजे. कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत लढता आली पाहिजे मध्येच सोडून द्यायची नाही. “करून तर बघू” हा मंत्र जपत पुढे जात राहायचं आणि स्वतःला घडवत जायचं. 

मनानी ठरवलं तर अशक्य काहीच नसतं, फक्त तुमची मनापासून ती गोष्ट मिळविण्याची तयारी पाहिजे आणि ती साध्य होईपर्यंत त्यात सातत्य असलं पाहिजे हेच माधुरीताईं कडून शिकायला मिळतं. 

बिइंग वुमन हे पाक्षिकही सर्व स्त्रियांना सामावून घेत त्यांच्या उन्नती करता कार्यरत आहे याचे माधुरीताईंना विशेष कौतुक आहे. त्यांनी बिइंग वुमनच्या पुढच्या संपूर्ण प्रवासाला मनापासून शुभेच्छा दिल्या.

लीना दामले

Share :