Being Woman

blog img

‘कॅलिडिओस्कोप’

अन्न हे पूर्णब्रह्म 

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे । सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।

जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥

     लहानपणी हा श्लोक शिकवला जातो पण आपण जसजसे मोठे होत जातो तसे हळूहळू याचा विसर पडायला लागतो. घरच्यापेक्षा बाहेरच्या जेवणात अधिक गोडी वाटते किंवा महाराष्ट्रीयन जेवणापेक्षा फास्टफूडची अधिक रुची वाटू लागते. आपण फक्त म्हणतो, परदेशात आपलं जेवणं मिळत नाही पण त्यासाठी आपण काहीतरी करावं असा विचार कधी करत नाही. परदेशाच्या प्रवासात एअर प्लेनमध्ये एकही महाराष्टीयन पदार्थ मिळू नये ही गोष्ट त्यांना रुचली नाही आणि एअर लाईनमध्ये वडापाव विकून दाखवेन तेव्हाच शांत बसेन असा ध्यास त्यांनी घेतला आणि आज जगातील सगळ्यात मोठं महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट संपूर्ण जगात त्या चालवतात. महाराष्ट्रीयन पदार्थ आणि संस्कृती जगभरात पोहचविण्याऱ्या “जयंती कठाळे”

      17 वर्ष नामांकित आयटी कंपनीमध्ये विविध पदांवर काम केलं. परदेशात कामासाठी जाताना त्यांना एक गोष्ट नेहमी जाणवायची ती म्हणजे खाण्याची आबाळ. महाराष्ट्रीयन फूड्स मिळत नाही. 14 वर्ष ही गोष्ट त्यांना त्रास देत होती  आणि अशाच एका परदेश प्रवासात आखणी झाली “पूर्णब्रह्म”ची. 

     लाखो रुपयांची नोकरी सोडून महाराष्ट्रीय पदार्थ जगभरात पोहचविण्यासाठी मराठमोळ्या नऊवारी वेशात 400 स्के.फू.मध्ये पूर्णब्रह्मचा श्रीगणेशा झाला. खूप विचार करून अभ्यासपूर्ण नियोजनाने याची आखणी केली. महाराष्ट्रीयन फूड दिसत तितकं अवघड नाही आणि वाटतं तितकं सोपंही नाही. 3 वर्ष लागली पूर्णब्रम्हचे मेन्यूकार्ड ठरवायला. दिवसाला 185 फूड्स पदार्थ रेस्टॉरंटमध्ये दिले जातात. 

     आज पूर्णब्रम्हच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन पदार्थ जगभरात पोहचले आहेत आणि ग्राहकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आयटी कंपनी ते पूर्णब्रम्ह हा प्रवास सोपा नव्हता. पहाटे 3.30 ला त्यांचं काम सुरू होतं ते रात्री 12 वाजेपर्यंत अविरतपणे सुरूच असत. आजपर्यंत जवळपास सात लाखाहून अधिक पुरणपोळ्या पूर्णब्रम्हने सर्व्ह केल्या आहेत. वडापाव आणि इतर पदार्थांची तर गणतीच नाही. अनेक अडचणींवर मात करत, घर आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी सांभाळत आज त्या एक यशस्वी उद्योजिका झाल्या आहेत. देशातील हे पहिले रेस्टॉरंट असेल जे फक्त एक महिला व्यावसायिक चालवीत आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबियांची उत्तम साथ लाभली आहे. आई, सासूबाई आणि सुधा मूर्ती या त्यांच्या आदर्श आहेत. 

     विचारांनी प्रगल्भ असणाऱ्या स्त्री कडे बघा. आपल्याला आपल्या प्रायॉरीटीज ठरवता आल्या पाहिजेत. त्या ज्या दिवशी ठरवता येतील तेव्हाच आपण स्वप्नांचा पाठलाग करू शकतो आणि एक स्त्री म्हणून सक्षमपणे उभं राहू शकतो. नवऱ्यासमोर नाक वर करून चालण्यापेक्षा त्याला सोबत घेऊन जाऊयात. सासू सासरे यांना नेहमीच दुष्मनाच्या पंक्तीत न ठेवता त्यांना मानानी सोबत घेऊन चला तेव्हाच तुम्ही एक स्त्री उद्योजिका म्हणून सक्षम बनाल. मल्टी टास्किंग कपॅसिटी स्त्रियांमध्ये असते त्याचा योग्य वापर केला पाहिजे. छोट्याछोट्या गोष्टींमध्ये न अडकता एकमेकींना साथ देत, स्वतःला घडवता आले पाहीजे. स्वकृता व्हा, स्वप्न बघा, ती पूर्ण करण्याचे नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा. एवढ्यावर थांबू नका तर सातत्याने प्रयत्न करत रहा यश नक्कीच मिळते. सहानुभूती मिळवू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसात देव बघायला शिका. त्याचबरोबर ट्रॅडिशन हे नुसतं बोलायचं नसतं तर ते कॅरी करण्याची ताकदही तुमच्यात असावी लागते हे त्या आवर्जून सांगत असतात. 

    आज पूर्णब्रम्हमध्ये जवळपास 50% महिलाच आहेत आणि पूर्णब्रम्हची फ्रांचायसी ही फक्त महिलांनाच दिली जाते कारण a potential of a woman who seeting inside a kitchen can be bought on a platform and can be served commercially यावर त्यांचा विश्वास आहे. 

     जगभरात महाराष्टीय पदार्थाला एक वेगळाच मानसन्मान त्यांनी मिळवून दिला आहे. आपल्या फूड कल्चरमध्ये खूप ताकद आहे. शेवटी मनापर्यंत जायचा रस्ता पोटातूनच जातो अस म्हणतात. जयंती कठाळे तुमचा हा संपूर्ण प्रवास एक आदर्श आहे. अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. बिइंग वुमनचा तुमच्या या कार्याला मानाचा सलाम! 

     बिइंग वुमन म्हणजे आदिशक्ती आहे. तिला ओळखा. हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे तो ओळखा आणि त्याची मदत घ्या. यशस्वी व्हा. थांबू नका कारण success is not a destination it’s a journey  याच धर्तीवर बिइंगवुमन काम करत आहे याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

Share :