भारतातील गोंड जमातीच्या लोकांमध्ये सप्तर्षींची एक वेगळीच गोष्ट वाचायला मिळते. ही गोंड जमात फार प्राचीन काळा पासून शेती करत आली आहे. शेती साठी त्यांनी खूप आकाश निरीक्षण करून त्यावरून काही ठोकताळे बांधलेले होते. त्यांच्यात सप्तर्षींचे चार तारे म्हणजे म्हातारीचे खाटले (पलंग) आहे आणि त्यावर घोंगडी पसरुन म्हातारी बसून आहे, तिला झोपायची परवानगी नाही. कारण तिच्या खाटल्याचे चार खूर सोन्याचे आहेत. ते चोरायला 3 चोर टपून बसले आहेत. म्हणजे सप्तर्षींच्या शेपटीचे 3 तारे. ते तीन चोर म्हणजे कोलाम, गोंड आणि परधान ( प्रधान ). म्हातारी जर झोपली तर त्याचा फायदा घेऊन हे तिन्ही चोर ते सोन्याचे खूर घेऊन जातील म्हणून तिला झोपायला परवानगी नाही. याचा अर्थ सप्तर्षी तारकासमूह त्यावेळी बुडतच नव्हता, सतत आकाशात दिसत होता असे सांगितले आहे. (1000 BCE ची ही गोष्ट आहे असेही सांगितले आहे). त्यावेळी काय स्थिती होती याचा शोध घ्यायला पाहिजे.
लीना दामले.
सप्तर्षींची ग्रीक पुराणातली गोष्ट
असे म्हणतात की ग्रीक देव ज्युपिटर ( काही ठिकाणी झिअस असे नाव येते ) हा कॅलिस्टो नावाच्या सुंदर स्त्रीवर फिदा झाला होता. त्यामुळे अर्थातच त्याची पत्नी ज्यूनो ( काही ठिकाणी ‘हेरा’ नाव आलय) ही संतापली. तिने रागाने कॅलिस्टोचे रूपांतर एका अस्वलात केले. या रुपात कॅलिस्टो भटकत असताना तिचाच मुलगा अर्कास तिला भेटला. तो शिकारीला निघालेला होता. पुत्रप्रेमाने न राहवून कॅलिस्टो अर्कासला कवटाळायला त्याच्या जवळ गेली. अर्कासने अर्थातच या नव्या रुपातल्या आईला ओळखले नाही. त्यामुळे तो तिला ठार मारणार हे भावी संकट ओळखून ज्युपिटरने त्याचेही रुपांतर अस्वलात केले आणि दोघांना उचलून आकाशात भिरकावून दिले. त्यांना त्यांच्या शेपटाला धरून उचलल्या मुळे त्यांच्या शेपट्या लांब झाल्या. तेच हे आकाशातले माय-लेक म्हणजे Ursa Major आणि Ursa Minor. म्हणजेच सप्तर्षी आणि ध्रुव मत्स्य. आपल्याकडे त्यांना बृहत् – ऋक्ष आणि लघु ऋक्ष असेही म्हणतात. माय अस्वल आणि तिचे पिल्लू अस्वल.
लीना दामले.