Being Woman

' पितृऋण '

भारतीय परंपरेत देव, पिता आणि ऋषी यांना तर्पण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यानुसार आपल्या पुर्वजांचे श्रद्धेने स्मरण, पूजन करण्याची प्रथा वर्षानुवर्षे जोपासली गेली आहे आणि म्हणूनच पितरांसाठी पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष म्हणजेच प्रतिपदा ते अमावस्या हा काळ हिंदू धर्म परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून मानला जातो. यालाच ‘महालय श्राद्ध’ असे देखील म्हणतात. महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर.
आपले दिवंगत पूर्वज म्हणजेच पितर या काळात पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांची पूजा या दिवसात केली जाते. म्हणून हा काळ शुभ मानला जात नाही. या पितृपक्षात श्राद्ध करायला जमले नाही, तर पुढे सूर्य वृश्र्चिक राशीत जाईपर्यंत म्हणजेच सुमारे पावणे दोन महिन्यांपर्यंत श्राद्ध पूजन करता येते. या श्राद्ध पूजेत आपले दिवंगत आई-वडिल, आजी-आजोबा, पणजी-पणजोबा, भाऊ-बहिण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या, सासू-सासरे, व्याही-विहिण, सावत्र नातेवाईक व इतर अनेक नातेवाईक या सगण्यांचे स्मरण करून पिंडदान करता येते. आपले गुरू, शिष्य, स्नेही, हितचिंतक, मदतनीस अशा सर्व दिवंगत व्यक्तींचे आपण श्राद्ध करू शकतो. त्यांच्याबद्दल प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच श्राद्ध करणे. ब-याचदा दिवंगत व्यक्तींची निधन तिथी माहीत नसते. म्हणून सर्वपित्री अमावस्येला सर्व पितरांचे श्राद्ध पूजन केले जाते.
श्राद्ध पूजेच्या निमित्ताने, कुटुंबातील सर्व नातेवाईक एकत्र येतात. अशावेळी आठवणी काढल्या जातात. त्यामुळे आपले पूर्वज कोण होते, त्यांचे कर्तृत्व काय होते, याची माहिती पुढील पिढीला मिळते. त्यांनी केलेली विशेष कामे, समाज व कुटुंबियांसाठी त्यांनी केलेले योगदान याबद्दलची माहिती पुढे येते. त्यांनी केलेल्या अभिमानास्पद कामगिरीमुळे आपलेही मन अभिमानाने भरून येते. आपल्यालाही वेगळी प्रेरणा यापासून घेता येते. अशारीतीने सामाजिक आणि कौटुंबिक इतिहास निर्माण होण्यास मदत होते.
पितृपक्ष काळ अशुभ मानला जातो, याचा विचार केला, तर असे मनात येते, की आपण या कालावधीत पूर्वजांचे स्मरण करत असतो, मग हा कालावधी अशुभ कसा? मला असे वाटते, की पूर्वीच्या काळी पायी किंवा बैलगाडीने प्रवास केला जाई. राना-वनातून, जंगलातून जावे लागे. पितृपक्षाच्या काळात पाऊस पडत असणार. आपल्या लक्षात येईल की, या काळात विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी दिसून येतात. जमिनीत पाणी मुरल्यामुळे विषारी कीटक, साप, विंचू इत्यादी बाहेर पडलेले असतात. या काळात रोगराई मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. अशावेळी बाहेर न पडता घरातच राहून पूर्वजांचे स्मरण म्हणजेच श्राद्ध करावे आणि म्हणूनच या दिवसात बाहेर पडू नये, मोठी खरेदी विक्री करू नये, विवाहाची बोलणी करू नये अशी पद्धत पडली असावी. बाहेरचे पावसाळी वातावरण, रोगराई पसरण्याची शक्यता या गोष्टींचा विचार केला असला पाहिजे.
आपल्या परंपरेत आपले सर्व सण, प्रथा, पूजा हे त्यावेळी आजूबाजूला असलेले वातावरण, निसर्ग व त्याप्रमाणे आहाराचे महत्त्व अशा परस्परपूरक गोष्टीत गुंफले गेलेले आहे. श्राद्ध पूजेमध्ये कावळ्याला खूप महत्व दिले गेले आहे. पितरांच्या रूपात आपण त्याला बघतो, त्यामुळे कावळ्याला घास/पान ठेवण्याची प्रथा पडली आहे. कावळ्याला पितरांचे स्थान दिल्यामुळे, कावळ्याचे अस्तित्व टिकून आहे. निसर्गाचा सेवक (कारण त्याला पाऊस किती पडणार, चारा किती उपलब्ध होईल याचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे तो घरटे बांधतो.) हुशार, बुद्धिमान, धीट, वड, पिंपळ यासारखे वृक्ष त्याच्यामुळेच निसर्गात अस्तित्व टिकून आहेत. कावळा हा पक्षी सगळीकडे आढळून येतो. कावळ्याचे हे सर्व गुण आपल्या पूर्वजांनी ओळखले आणि त्याला पितरांचे स्थान दिले.
अशी ही आपली हिंदू परंपरा, संस्कृती विविध प्रकारच्या व्रत-वैकल्ये, पूजनाने नटली आहे. ज्या पूर्वजांमुळे मी आज आहे, हा लेख लिहू शकले त्या पूर्वजांबद्दल मी हा लेख लिहून कृतज्ञता व्यक्त करते. 
      
–  चित्रा लेले