Being Woman

'लिंब'

माझं माहेरचं गाव लिंब. इथे आमचा वाडा होता 47 सालि जळल्यावर तो वाडा आजोबांनी तो पुन्हा बांधला. बरीच पडझड झाली होती. आता माझ्या भावाने नवीन स्वरूपात पुन्हा बांधला आहे. लिंब हे पुणे सातारा हायवे वरती सातारा अलीकडे 15 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डावीकडे आत मध्ये तीन किलोमीटरवर आहे. आम्ही दरवर्षी येथे कृष्णाबाई उत्सव साजरा करतो कृष्णा नदी गावातून वाहते. तिच्या काठावर ते अतिशय सुंदर घाट बांधलेले आहेत ,देवळे आहेत. या घाटावरच कृष्णमाई चा उत्सव साजरा होतो.
या उत्सवाला साडेतीनशे वर्षाची परंपरा आहे वाईच्या शेंडे शास्त्रींनी कृष्णाबाई ला नवस बोलला होता शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला मारण्यासाठी प्रतापगडावर आले त्यावेळी ‘महाराजांना सुखरूप ठेव. आम्ही तुझा उत्सव साजरा करू.’ कृष्णानदी ही महाबळेश्‍वरला उगम पावते महाबळेश्वरला पहिला उत्सव होतो त्यानंतर वाईमध्ये , वाई नंतर भुईंज ,माहुली, लिंब, उंब्रज , कराड सांगली,कुरुंदवाड,नरसिंहवाडी या ठिकाणी उत्सव साजरा होतो महाराष्ट्रात महाबळेश्वरपासून कृष्णानदी जिथून दुसऱ्या राज्यात कर्नाटकात जाते तिथे तिथे प्रत्येक घाटावरती हा उत्सव साजरा होतो.
लिंब मध्ये कृष्णा बाईची सुंदर पंचधातूची मूर्ती आहे तिची स्थापना करतात गुढीपाडव्यापासून दहा दिवसानंतर या उत्सवाची सुरुवात होते. गुढी पाडाव्या ला मंडपाची मुहूर्तमेढ होते सगळे जण तिथे जमतात.लिंब गाव सोडून गेलेले हे सगळेजण वर्षातून एकदा लिंबात येऊन हा उत्सव साजरा करतात.
सोडून गेलेले असे मी म्हणाले त्याचा अर्थ १९४८ साली घरे जाळल्यावर स्थलांतरित झालेली अनेक कुटुंबे या उत्सवाशी जोडली आहेत. त्यांच्या ४थी पिढीने आता उत्सवाची धुरा संभाळली आहे. लहान असताना आम्हा सगळ्या मुलांना या उत्सवाचे आकर्षण होते. . तिथे ७ दिवस एकत्र राहायचे .सगळया आजी आजोबांकडून कौतुक करून घ्यायांचे. आणि महत्वाचे म्हणजे रोज नदीवर जाऊन पाण्यात डुंबत बसायचे. गुढीपाडव्यानंतर मांडव घातला जायचा ,आणि द्वादशीला देवीची प्रतिष्ठापना व्हायची .
तर या उत्सवात घडलेले बदल सांगायचे आहे १५ वर्षांपूर्वी उत्सवाचा मांडव घाटावर घातला जायचा आरती ,पूजा आणि कीर्तन रोज रात्री घाटावरच असायचे. आफळेबुवांची कीर्तने ७ दिवस असायची.
भगिनी मंडळाचे हळदी कुंकू घाटावर असायचे .गावातील सगळ्या बायका कृष्णा बाईच्या दर्शनाला हळदी कुंकवाला यायच्या . उत्सव संपायच्या अडले दिवशी छबिना म्हणजे कृष्णाबाईची पालखीतून मिरवणूक असायची. झगझगाट नाही ,डीजे नाही, बत्तीचा आणि मशाली चा प्रकाश आणि ढोल ताशे पारंपरिक वाद्य असायची रात्री १२ पर्यंत छबिना गावातून फिरत यायचा. प्रत्येक घरासमोर ५/१० मिनिटं पालखी थांबली कि आजूबाजूच्या घरातील बायका ओटी भरायच्या.
७ दिवस एक एक जणांनी नैवद्य मागून घेतलेला असतो. , गावातील व्यापारी पण एक दिवस नैवेद्य करायचे ,एकदिवस मुख्य दिवस ,एक दिवस गावकऱ्यांसाठी घाटावर भंडारा असायचा.
आता बरेच बदल झाले पण मजा तीच आहे.
आता उत्सव घाटावर नाही तर खांडेकर यांनी उत्सवाला दिलेल्या वाड्यातच साजरा होतो.नदी ची डगर उतरणे चढणे वयस्कर लोकांना जमेनासे झाले. वाड्या समोरच मांडव घातला जातो, तसाच रोज स्वैपाक होतो , गावातले शेतकरी रोज सकाळी भाजीच्या टोपल्या आणून देतात त्यामुळे कैरीची चटणी, वांग्याची नाही तर कोबीची भाजी,भात आमटी ,पोळ्या गव्हाची खीर ,शिरा असा बेत असतो . त्याच उत्साहाने आरती,होते,अभिषेक, होतो .कीर्तने होतात, सिनेमा दाखवला जातो .छबिना पण नवीन पिढी तशाच प्रथे प्रमाणे काढते ,छबिना थांबत थांबत पुढे जातो,गुलाल उधळतात. “आई जगदंबे कृष्ण बाई मला ठाव द्यावा पायी ” हे भजन म्हणत १०वाजेपर्यंत छबिना संपतो. .
मला या ३५० वर्षाच्या परंपरेच्या उत्सवाची ओढ आहे. त्यामुळे उत्सवाची पत्रिका आली कि जायचे हे ठरलेले असते. आतातर काय तिथला माझ्या आजोबांचा वाडा बांधून तयार आहे ,आता ७ दिवस पण राहू शकतो . आणि उत्सवात त्या घरात जाऊन राहायचे लहानपणी जसे राहायचो तसे या कल्पनेने सगळया आठवणी दाटून आल्या आणि हा लेख लिहिला गेला. यामध्ये खूप गोष्टी राहून गेल्यात
त्यासाठी मोठे पुस्तकच होईल. तिथली एक एक व्यक्ती वर एक एक पान होईल.
असे म्हणतात कि फक्त १९४८ साली उत्सव झालेलं नाही आणि २ वर्ष कोविड च्या साठी मुळे झाला नाही .या वर्षी पण कमीत कमी लोक बोलावून सर्व नियम पाळून उत्सव  होईल

- Rohini Wanjpe