Being Woman

February 2022

प्रेम म्हटलं की कृष्ण आठवतोच आणि कृष्ण म्हटलं की मोरपीस!प्रेमाचे क्षण मोरपिशीच असतात ना म्हणून म्हटलं प्रेमाचा मोरपिशी दिवस.आज प्रेमदिनी प्रेमाची अनेक रूपं न्याहाळताना प्रथम मनात अवतरला तो कृष्णरंग.मोहक निळाई.ही निळाई मोहमयी काव्य घडवते देहात आणि डोळ्यात मोर नाचतात.अनंत डोळे फुटतात त्या मोरपंखांना.त्यांना दिसतं ते फक्त प्रेमच.
प्रेम जडलं की अंतर्बाह्य स्वरूपच बदलून जातं त्या त्या जीवाचं.माणसाचंच असं नाही.निसर्गातली प्रत्येक वैभवी अस्तित्वं ही फक्त ह्या प्रेममयी निरागसतेनं स्वतःला समर्पित करतात या अनंत अवकाशात.शिशिराच्या बोचऱ्या थंडीत होणारी झाडांची पानगळ,मायेने या वसुंधरेवर उबेचं पांघरूण घालत असते.तिच्या कायेला जपण्यासाठी आपला देह झाडून तिच्या देहावर देह अंथरतात ही झाडं.एखाद्या स्वयंभू शिवलिंगावर अनंत काळ अभिषेक करणारा जलस्रोत पाहिलाय ना तुम्ही. कुठल्या मायेचं हे जग.ना कुठली वाच्यता ना कुठला युगायुगांचा शीण.सतत देहसमर्पण,अविरत वाहती अमर्याद प्रितीची अर्ध्ये.
जगणं सुंदर करणारी विलक्षण विलक्षण अद्भुत किमया म्हणजे प्रेम.गर्भात बीज रुजलं की हळूवार पोटावरून हात फिरवणारी आई.ती प्रेमात असते त्या बाळाच्या.त्याची क्षणोक्षणी वाट पहात असते.ते बाळ जन्माला येतं तेव्हा डोळेभरून आपलाच अंश न्याहाळते.त्याला गोंजारते,कुरवाळते.गालावर गाल घासते.किती हजारदा गोड मुके घेते त्या तान्हुल्याचे. किती गोंडस दिसतात ती रूपं तेव्हा.ते बाळही वात्सल्याच्या आधीन असतं आणि ती आईही.वेल्हाळ दिसतात ना मायलेकरं.एक मधुर ओलावा झिरपत असतो या प्रेमात पडलेल्या जीवांच्या रंध्रारंध्रातून

Share :