Being Woman

December 2022

बिइंग ववुमनच्या या अंकात सगळ्यांचे मनःपूर्वक स्वागत. दिवाळी अंकाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. पहिलाच दिवाळी अंक आणि त्याला वाचक रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. ४ थ्या वर्षात पदार्पण करताना अतिशय आनंद होतो आहे. हे वर्ष सरतासरता मला असे वाटले की डिसेंबरमध्ये आपण केलेले संकल्प आठवावेत. त्याची यादी करून त्याचे काय झाले? आपण किती संकल्पांची पूर्तता केली? असे केल्यास नवीन वर्षात पुन्हा जोमाने काम करता येईल. आपण नेहमी नवीन वर्षांत संकल्प करतो. ते विसरूनही जातो. त्यावर विनोदही करतो. परंतू मागील वर्षात फेरफटका मारताना लक्षात आले की खरंच मासिक आता वेगळ्या उंचीवर आले आहे आणि अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी घडत आहेत.
भारतात या वर्षी आपण आपले सगळे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाचे सर्व सामने विना विघ्न पार पडले आणि आता फिफा या. ४ वर्षांनी होणाऱ्या फुटबॉल सामन्यांनी कतारमध्ये मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे.सिनेमा जगतात सुद्धा उंचाई सारखा एक सिनेमा लोकांना नवी शिकवण देऊन गेला. कौन बनेगा करोडपतीने आपले २२ सिझन पूर्ण केले. या वर्षी मनोरंजनाबरोबर आर्थिक आणि नोकरीच्या संदर्भात ट्विटर आणि अमेझॉन या सारख्या मोठ्या कंपन्यांतून हजारो लोकांना काढण्यात आले. मंदीचे वातावरण जगभर निर्माण होत आहे. काही चांगल्या तर काही नकारात्मक गोष्टी आजूबाजूला घडत आहेत. या कंपन्या अशा आहेत ज्या फक्त व्हर्चुअल पद्धतीने चालवतात. म्हणजे अमेझॉन, ट्विटर यांच्याकडे त्यांचे प्रोड्क्शन नसते, ट्रेडिंग करणे, मेसेजिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बिझिनेस करणाऱ्या या कंपन्या कधीही तोट्यात जाऊ शकतात. 

Share :